सासवड (पुणे) विमानतळासाठी आमच्या भूमी आम्ही देणार नाही ! – उपोषणकर्त्या शेतकर्‍यांचा ठाम निर्धार

विमानतळ प्रकल्प रहित करण्याची मागणी

आंदोलनकर्ते

सासवड (पुणे) – आम्ही आमच्या भूमी देणार नाही. आम्हाला पैसे नको आहेत. ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे, त्यांनी स्वत:च्या भूमी द्याव्यात. आमच्या भूमीत कुणालाही पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी विमानतळ प्रकल्प बाधित शेतकर्‍यांनी देत विमानतळाला विरोध केला आहे. जोपर्यंत विमानतळ प्रकल्प रहित केल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच रहाणार आहे, असा निर्धारही शेतकर्‍यांनी केला आहे.

‘आम्हाला विमानतळ नकोच’, अशी घोषणा देत ७ गावांतील शेतकर्‍यांनी सासवडमधील प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण चालू केले आहे. उपोषण चालू असतांना तहसीलदार विक्रम राजपूत यांनी उपोषणकर्त्या शेतकर्‍यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आमच्या भावना जोपर्यंत शासनापर्यंत पोचत नाहीत. शासन आमची नोंद घेणार नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात, त्या तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येतील. बाधित शेतकर्‍यांनी स्वत:च्या समस्या लेखी स्वरूपात प्रांताधिकार्‍यांकडे सुपूर्द केल्या.