जीवनाडी पट्टीद्वारे साधकाला सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय, हे उपाय करण्यामागील परात्पर गुरु डॉक्टरांचा दृष्टीकोन आणि साधकाला त्यामुळे झालेले लाभ !

श्री. राम होनप

१. नाडीपट्टीवाचकांच्या माध्यमातून जीवनाडी पट्टीद्वारे अत्रि ऋषींनी सांगितलेले काही आध्यात्मिक उपाय ! 

‘साधारण १० वर्षांपूर्वी एका नाडीपट्टीवाचकांनी मला जीवनाडी पट्टीद्वारे अत्रि ऋषींनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय करण्यास सांगितले होते. प्रत्येक मासात कृष्ण आणि शुक्ल या पक्षांच्या त्रयोदशीच्या दिवशी ‘प्रदोष काळ’ येतो. (सूर्यास्तापूर्वीची ४५ मिनिटे आणि सूर्यास्तानंतर ४५ मिनिटे यांमधील कालावधीला ‘प्रदोष काळ’, असे म्हणतात.) नाडीपट्टीवाचकांनी सांगितले, ‘तुम्ही प्रदोषकाळी शिवमंदिरात जायचे. प्रथम मंदिरातील नंदीच्या उजव्या कानात तुम्ही तुमच्या सर्व अडचणी सांगायच्या. त्यानंतर तेथील शिवपिंडीचे दर्शन घ्यायचे. नंतर शिवाला मध आणि नारळ अर्पण करायचा. शेवटी तुपाचा दिवा लावून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप १०८ वेळा करायचा. हा उपाय तुम्ही आयुष्यभर करा. त्यामुळे तुमच्या साधनेतील अडथळे हळूहळू न्यून होतील आणि तुम्हाला भगवान शिवाकडून ज्ञानाची प्राप्ती होईल !’

२. परात्पर गुरु डॉक्टरांनीही साधकाला सर्व आध्यात्मिक उपाय करण्यास आणि त्याचा अभ्यास करण्यास सांगणे 

वरील विषय परात्पर गुरु डॉक्टरांना सांगून मी विचारले, ‘‘वरीलप्रमाणे सर्व आध्यात्मिक उपाय करावेत का ?’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हो. त्यातून आपला अध्यात्माचा अभ्यास होईल आणि शिकायलाही मिळेल. मंदिरात जाऊन उपाय केल्याची वेळ तू तुझ्या नामजपादी उपायांच्या एकूण वेळेत मोजत जा.’’ त्यानंतर मी वरील उपाय करू लागलो.

३. उपायांमुळे झालेले लाभ 

३ अ. प्रदोषकाळी शिवाची उपासना करण्यास प्रारंभ केल्यावर साधकाला ‘डोक्यावरील त्रासदायक सूक्ष्म लहरींचा प्रभाव हळूहळू न्यून होत आहे’, असे जाणवणे : उपायांपूर्वी मला माझ्या डोक्यावर त्रासदायक लहरी जाणवत होत्या. ‘या सूक्ष्म लहरी माझ्या नक्षत्रदोषामुळे निर्माण झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते. या त्रासदायक लहरींचा विपरित परिणाम माझ्या बुद्धीवर होत होता. त्यामुळे मला ‘काही न सुचणे, बुद्धी भ्रमित होणे, डोक्यावर जडपणा जाणवणे, निर्णय घेतांना अडचण येणे’, असे त्रास होत होते.

प्रदोषकाळी शिवाची उपासना करण्यास प्रारंभ केल्यावर ‘त्रासदायक सूक्ष्म लहरींचा माझ्यावरील प्रभाव हळूहळू न्यून होत आहे’, असे मला जाणवू लागले. त्यामुळे बुद्धीला स्थिरता जाणवणे आणि सुचू लागणे यांचे प्रमाण वाढले.

३ आ. शिवाची उपासना या उपायामुळे मागील जन्मांतील कर्मदोषांचा नकारात्मक परिणाम न्यून होऊन हलके वाटू लागणे : एखाद्यावर पुष्कळ कर्ज आहे आणि त्यातील काही कर्ज फिटले, तर त्या व्यक्तीला हायसे वाटू लागते. त्याप्रमाणे प्रत्येक प्रदोषकाळी उपाय केल्यानंतर मला हलके वाटते. माझ्या मागील जन्मांतील कर्मदोषांचा माझ्यावरील नकारात्मक परिणाम भगवान शिवाच्या कृपेमुळे हळूहळू न्यून होऊ लागल्याने मला हलके वाटत आहे.

४. सूक्ष्मातील ज्ञान मिळण्याची गुणवत्ता वाढणे 

भगवान शिवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातील ज्ञान मिळतांना त्यात ‘सुस्पष्टता असणे, त्यातील सूक्ष्मता वाढणे, तसेच नाविन्यपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होणे’, या अनुभूती मला येत आहेत.

वरील सर्व लाभ अत्रि ऋषि, भगवान शिव आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळे झाले आहेत. याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४)

श्री. राज कर्वे

प्रश्न : शिवाची उपासना या उपायामुळे मागील जन्मांतील कर्मदोषांचा नकारात्मक परिणाम न्यून होतो का ?

उत्तर : साधारणपणे कोणतीही सकाम स्वरूपाची उपासना करण्यामागील उद्देश हा ‘मागील जन्मांतील कर्मदोषांचा (प्रारब्धाचा) नकारात्मक परिणाम न्यून होणे आणि इच्छित लाभ होणे’ हा असतो. संत, नाडीपट्टीवाचक किंवा ज्योतिषी हे व्यक्तीच्या प्रारब्धातील अडथळे ओळखून ते दूर होण्यासाठी विशिष्ट उपासना करायला सांगतात. व्यक्तीला प्रारब्धामुळे येणार्‍या अडथळ्यांचे स्वरूप आणि त्यांचे निवारण करण्यासाठी पूरक असलेले विशिष्ट देवतेचे तत्त्व यांनुसार उपासना सांगितली जाते. संत, नाडीपट्टीवाचक, ज्योतिषी आदी बहुतांश वेळा ईश्वरी प्रेरणेनुसार उपासना सांगतात. उपासना सांगणारी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असल्यास, तसेच उपासना श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास मागील जन्मांतील कर्मदोषांचा (प्रारब्धाचा) नकारात्मक परिणाम निश्चित न्यून होतो.

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक