सनातनच्या १०० व्या संत पू. (श्रीमती) सीताबाई श्रीधर जोशी (वय ९९ वर्षे) आणि त्यांचे कुटुंबीय यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सत्संगात झालेला भक्तीपूर्ण संवाद !

हुब्बळ्ळी, कर्नाटक येथून श्रीमती सीताबाई श्रीधर जोशी (वर्ष २०२५ चे वय ९९ वर्षे) सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या समवेत त्यांची कन्या श्रीमती मीरा करी (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ६७ वर्षे), जोशीआजी यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सूनबाई आल्या होत्या. त्याचसमवेत जोशीआजी यांचे नातजावई श्री. विनायक शानभाग (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आणि वय ४२ वर्षे) आणि नात सौ. विद्या शानभाग हेही होते. या सर्वांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. सत्संगात झालेले संभाषण पुढे दिले आहे. यानंतर दोनच दिवसांनी रामनाथी आश्रमात श्रीमती सीताबाई जोशी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्या ‘सनातनच्या १०० व्या संत’ म्हणून संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ एप्रिल २०२५ या दिवशी संवादातील काही भाग पाहिला. आज त्यापुढील संवाद येथे दिला आहे. (भाग २)

या लेखातील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/900022.html

पू. सीताबाई जोशी

३. वरदहळ्ळी, कर्नाटक येथे पू. सीताबाई जोशी यांनी केलेली साधना 

परात्पर गुरु डॉ. आठवले : आजींचे सगळे असाधारण आहे ना ? कुणी गुरु नाही आणि शिकवणारेही कुणी नाही.

पू. सीताबाई जोशी : माझ्या स्वप्नात स्वामीजी (प.प. श्रीधरस्वामीजी) यायचे. त्यांनी पुष्कळ मोठे मठ बांधले आहेत. मी वरदहळ्ळीमध्ये १४ वर्षे होते. मी तेथे केर काढणे, रांगोळी काढणे, यांसारख्या सेवा पुष्कळ करायचे. तेथे येणार्‍या भक्तांना मी विचारायचे, ‘‘तुम्ही कोणती सेवा करता ? तुम्हाला दर्शन कसे घडले ?’’ ते मला ‘आपण कसे रहायला हवे ?’, याविषयी सांगायचे. त्यांचे ऐकून मी सर्व शिकले. माझ्यात भक्तीभाव होता. तो वाढण्यासाठी तेथील भक्तांचे मला पुष्कळ साहाय्य मिळाले. तेथे गेल्यावर मला पुष्कळ आनंद व्हायचा. तुम्ही (प.पू. डॉक्टर) आल्यावर भक्तांना (साधकांना) जसा आनंद होतो, तसा आनंद तेथील भक्तांना बघून मला होत होता. ‘सर्व लोक आपलेच आहेत’, असे मला वाटायचे. ते सर्व बघून मला आनंदीआनंद व्हायचा. आता मनात सर्वांप्रती आत्मीयता निर्माण झाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अध्यात्मात साधकांना ओळखता येणे, हेच पुष्कळ महत्त्वाचे आहे.

श्री. विनायक शानभाग

४. पू. आजींची आनंदावस्था पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना गाणे म्हणण्यास सांगणे आणि पू. आजींनी २ भावपूर्ण कन्नड गीते गाऊन दाखवणे 

पू. सीताबाई जोशी : माझ्या आतमध्ये आनंद अगदी ओसंडून वहात आहे. मला ‘नाचावे, गावे आणि उड्या मारावे’, असे वाटत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही गाणे म्हणाला होता ना, ते आता म्हणा.

श्री. विनायक शानभाग (पू. आजींचे नातजावई) : पू. आजी, गुरुदेवांना तुमचे गाणे ऐकायचे आहे. तुम्ही गाणे म्हणून दाखवता का ?

सौ. विद्या शानभाग (पू. आजींची नात, मुलीची मुलगी) : आजी, तू गाणे गाऊन दाखव ना. ते दिवाळीचे गाणे म्हणतेस ना, ते म्हण. तू गुरूंसमोर म्हणतेस ना, ते गाणेही म्हण.

४ अ. पू. आजींनी कन्नडमध्ये गायलेल्या ‘येरे कृष्णा’ या गीताचा भावार्थ ! : ‘हे दयाळू कृष्णा, आम्हा सर्वांवर कृपा कर. जेव्हा इंद्रदेव ग्रामस्थांवर क्रोधित होऊन मुसळधार पाऊस पाडतो, तेव्हा ग्रामस्थ श्रीकृष्णाला शरण जातात. श्रीकृष्ण सर्वांना गोवर्धन पर्वताजवळ बोलावतो आणि आपल्या करंगळीने तो पर्वत उचलतो. त्यामुळे त्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण होते. अशा त्या भगवंताची आम्ही स्तुती करतो. राजसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असतांना श्रीकृष्ण तिच्या साहाय्यासाठी धावून गेला आणि त्याने द्रौपदीचे रक्षण केले. अशा हे दयाळू श्रीकृष्णा, आम्हा सर्वांवर तू कृपा कर !’

सौ. विद्या शानभाग

४ आ. ‘गुरु महिमा’ या कन्नड गीताचा भावार्थ ! : ‘दोड्डेरी’ क्षेत्रात रहाणार्‍या गुरूंचे महत्त्व अपरंपार आहे. त्यांचे वर्णन करणे अशक्य आहे. गुरु आणि शिव यांच्यात काहीही भेद नाही. गुरु सर्वज्ञ आहेत. गुरूंविना जीवनाला दिशा नाही. गुरूंविना खरे सुख आणि शांती नाही. गुरु ही सामान्य व्यक्ती नाही. गुरुदर्शन म्हणजे नित्य आणि सत्य प्रकाशाचा दीपोत्सवच आहे. गुरूंचे महत्त्व अनंत आहे. आपला प्रत्येक दिवस गुरुचिंतनात व्यतीत करावा.

नामस्मरणाचे महत्त्व समजून घ्यावे. दत्तगुरूंचे नाम अतिशय मधुर आहे. ते मनाला शांतता देते. दत्तगुरु हेच साईनाथ आहेत.

दीपावलीच्या वेळी एका गरीब अशा भक्त स्त्रीच्या घरी तेल नव्हते. त्यामुळे तिच्या घरात अंधार होता. ती आपल्या गुरूंचे, साईबाबांचे स्मरण करते. तेव्हा तिच्या विनवणीला प्रतिसाद देऊन साईबाबांनी तेलाऐवजी पाण्याने दिवा लावला. हाच खरा दीपोत्सव !

श्रीकृष्ण देवकीचा आनंदकंद (पुत्र) होता. तो राधेचा गोविंद आणि यशोदानंदन होता. त्याने वृंदावनात नरकासुराचा वध केला. हीच खरी आनंदाच्या प्रकाशाची दीपावली ! हाच नामाचा महिमा आहे.

४ इ. ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ अशा अवस्थेत असलेल्या पू. आजींची भावस्थिती !

पू. (श्रीमती) सीताबाई जोशी : आता मी सर्व विसरून गेले आहे. आतमध्ये इतका आनंद भरला आहे की, मी सर्व विसरूनच गेले आहे. मी संगीत विसरून गेले. शब्दही विसरून गेले. आता मला काहीच सुचत नाही. ‘काय बोलावे ?’, तेही कळत नाही. ‘मी वृंदावनात कृष्णासाठी उभी आहे’, एवढे मात्र मला ठाऊक आहे. भजन करण्यापूर्वी मी देवासाठी पाणी भरून ठेवते. तेव्हा ‘तुमच्यासाठी (भगवंतासाठी, परात्पर गुरु डॉक्टरांसाठी) गंगोदक आणून ठेवले आहे’, असा माझा भाव असतो. भजन झाल्यानंतर मी ते पाणी भगवंताला अर्पण करून तीर्थ म्हणून घेते. त्या वेळी मला मिळालेल्या आनंदात मी माझे आजारपण आणि चिंता सगळेच विसरून जाते. ‘भगवंताने सगळ्यांना आनंदी ठेवायला पाहिजे’, असे मला वाटते. सगळ्यांच्या उद्धारातच मला आनंद मिळतो.

लोक आता टी.व्ही. बघण्यात वेळ घालवतात. त्यामुळे कुणी बोलायला आणि असा विषय ऐकायला येत नाही. कलीयुगात सर्व कठीण आहे. अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या पुण्याईमुळे सर्व चालू आहे. भगवंता, मी प्रत्यक्ष कृष्ण परमात्म्यासमोरच बोलत आहे. तुम्ही माझा उद्धार केलात ! मला पुष्कळ आनंद झाला आहे आणि त्या आनंदानेच माझे पोट भरले आहे. आता माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत. (हे सर्व बोलतांना पू. आजींचा भाव जागृत झाला.)

परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच छान !

पू. सीताबाई जोशी : आमचे सगळे वाईट प्रारब्ध आता संपले. आता आनंदाने दिवस काढायचे. ती आमची भक्तमंडळी आहेत ना, ती मला म्हणतात, ‘‘आजी, तुम्ही इथे या. आम्ही तुमची सगळी सेवा करतो.’’ मी कुठे गेले, तरी ते मला बोलवत असतात. मी जाईन, तेथे मला सर्वांची प्रीती मिळते.

५. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर ‘मला देव मिळाला’, असे सांगणार्‍या पू. आजी आणि ‘तुमच्या रूपात आम्हालाही देव मिळाला’, असे सांगणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. आठवले : मी आतापर्यंत शेकडो संत पाहिले; पण तुमच्यासारखे कुणीच नाही.

पू. जोशीआजी : तुम्ही माझ्या समाधानासाठी असे सांगत आहात. आज मी त्या बाळाला (सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २८ वर्षे) यांना) पाहिले. त्यांचे डोळे पाहिले, तर ‘ते अखंड नामजप करत आहेत’, असे मला वाटले. मी त्यांचे पाय धरले. तेव्हा मला ते देवाचे पाय, म्हणजे दत्तगुरूंचे पाय धरल्याप्रमाणे मऊ लागले. खरंच, तुम्ही किती केले आहे. ‘मला देव मिळाला’, एवढेच मी सांगू शकते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : (तुमच्या रूपात) आम्हालाही देव मिळाला !                                                   (क्रमशः) 

या लेखातील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : – https://sanatanprabhat.org/marathi/900772.html