हुब्बळ्ळी, कर्नाटक येथून श्रीमती सीताबाई श्रीधर जोशी (२०२५ चे वय ९९ वर्षे) सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या समवेत त्यांची कन्या श्रीमती मीरा करी (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ६७ वर्षे), जोशीआजी यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सूनबाई आल्या होत्या. त्याचसमवेत जोशीआजी यांचे नातजावई श्री. विनायक शानभाग (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आणि वय ४२ वर्षे) आणि नात सौ. विद्या शानभाग हेही होते. या सर्वांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. सत्संगात झालेले संभाषण पुढे दिले आहे. यानंतर दोनच दिवसांनी रामनाथी आश्रमात श्रीमती सीताबाई जोशी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्या ‘सनातनच्या १०० व्या संत’ म्हणून संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

८ एप्रिल २०२५ या दिवशी संवादातील काही भाग पाहिला. आज उर्वरित संवाद येथे दिला आहे. (भाग ३)
या लेखातील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/900346.html

६. काही दिवसांसाठी आश्रमात आल्यावर साधकांकडून शिकणार्या पू. आजी आणि ‘स्वतःचा उद्धार कसा करायचा ?’, हे आजींकडून शिकावे, असे सांगणारे परात्पर गुरु डॉक्टर !
पू. आजी : आज मला पुष्कळ आनंद झाला. तुम्ही सगळ्यांचे उद्धारक आहात. तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद देता आणि सगळ्यांचा उद्धार करता !
परात्पर गुरु डॉ. आठवले : मी सगळ्यांना काय शिकवणार ? ‘स्वतःचा उद्धार कसा करायचा ?’, हे सगळ्यांनी आजींकडून शिकावे !
पू. आजी : आता मी येथे आश्रमात राहिले आहे, तर साधकांकडून शिकत आहे. साधक किती सेवा करतात ! मी येथे आल्याचे सार्थक झाले. तुमच्या कृपेने मला सर्व मिळाले. तुमचा आशीर्वाद असू दे. मी आता बोलणे कमी करायला पाहिजे; पण ते माझ्या हातात नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता स्वतःसाठी बोलायचे नाही, तर दुसर्यांना शिकवण्यासाठी बोलायचे.
७. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आश्रमात राहून तुम्ही साधकांना भक्तीयोग शिकवा’, असे पू. आजींना सांगणे
श्रीमती मीरा करी (पू. आजींच्या कन्या) : आजींची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यामध्ये ताकदच नाही. त्यामुळे त्यांना अधिक वेळ बसता येत नाही. आश्रमातील चैतन्याच्या बळावर त्यांच्या सर्व कृती चालू आहेत. भगवंताच्या चैतन्यामुळेच सर्व चालू आहे.
पू. आजी : आता माझ्या कोणत्याच अपेक्षा उरल्या नाहीत. आता माझ्या हातात काही नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : माझी मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहे. इकडे (आश्रमात) राहून तुम्ही साधकांना भक्तीयोग शिकवावा !
पू. आजी : हो. मलाही पुष्कळ वाटते. कुणी भेटले की, मी त्यांना ‘असे करा, भजन करा, तुम्ही नामजप करा’, असे सांगते. माझी आई अशीच होती. मग मी झाले आणि नंतर ही मुलगी अन् नातही अशा (भक्तीमार्गी) झाल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे तुमच्याकडे हे अनुवंशिकच आहे. फारच छान !
८. नामस्मरण आिण भजन केले, तर भगवंत सर्व देतो ! – पू. सीताबाई जोशी
पू. आजी : तुम्हाला भेटून माझे सर्व त्रास संपले, एवढे मात्र निश्चित आहे. इतर सर्वांनाही असाच आनंद मिळू दे. नामस्मरण आणि भजन केले, तर भगवंत सगळेच देऊन टाकतो. तो सर्वांना आनंद वाटून टाकतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. सगळ्यांना असा आनंद मिळू दे. पुनरागमनायच !
पू. आजी : तुम्ही किती छान बोलता ! तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मलाही आनंद मिळाला. तुम्ही मला चांगला आशीर्वाद दिला.
पू. आजी : माझ्या आतमधून देव बोलतो. तुम्ही हे सर्व करत आहात. भक्तांना मार्ग दाखवत आहात ना !
९. ‘भगवंतासमवेत चालल्याने ‘पुण्य मिळते’, असे सांगून परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत काही पावले चालण्याची सिद्धता करणार्या वयोवृद्ध पू. आजी !
परात्पर गुरु डॉ. आठवले : पू. आजी, तुम्ही नुसत्या खोलीत असलात, तरी तुमच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. तुमच्याकडून चैतन्य मिळते. आता शब्दांतील शिकवण नको. तुम्ही नुसत्या खोलीत गेलात, बसलात किंवा ध्यान लावले, तर तिकडे येणार्या साधकांना चैतन्य मिळेल. आज मला येथून जावेसेच वाटत नाही. इतका आनंद आयुष्यात कधी झाला नव्हता. मला ‘तुमच्याकडे बघत चालावे’, असे वाटत आहे.
पू. आजी : मी थोडे अंतर गुरुदेवांसोबत चालते. भगवंतासमवेत चालल्याने ‘पुण्य मिळते’, असे म्हणतात.
१०. ‘वृंदावनात जाते’, असे सांगून रामनाथी आश्रमात आलेल्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी वापरलेल्या आरशात स्वतःला पािहल्यावर ‘माझे सर्व कष्ट दूर झाले’, असे सांगणार्या पू. आजींची गुरुदेवांवरील भक्ती !
पू. आजी : आज येथे येण्याचा योग होता. काहीतरी ऋणानुबंध होते. तुम्ही मला भेटलात. ‘मी पुष्कळ पाप केले होते’, असे मला आमचे गुरुजी सांगायचे. मी पुष्कळ कष्ट सोसले आहेत. माझी सूनबाई जणू अन्नपूर्णा आहे. ती श्रावणकुमार सारखीच माझी सेवा करते. कलियुगामध्ये एवढे कुणी करत नाहीत. आता मुले स्वतःच्या आई-वडिलांनाही बघत नाहीत.
‘मी वृंदावनात जात आहे’, असे सांगून येथे आले आहे. आता मला सगळे मिळाले. आमच्याकडून कितीही चुका झाल्या, तरी तुम्ही त्या पोटात घालता आणि समाधानाने बोलता.
सौ. विद्या शानभाग (पू. आजींची नात, मुलीची मुलगी) : पू. आजींनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तुमचे छायाचित्र पाहिले होते. आता त्यांना प्रत्यक्ष तुमचे दर्शन झाले. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पहातांना तेथील आरसा पाहून पू. आजींचा भाव जागृत झाला होता.
पू. आजी : त्या प्रदर्शनात तुम्ही पूर्वी वापरत असलेला आरसा ठेवला आहे. तुम्ही पाहिलेल्या आरशात मी स्वतःला पाहिले. तेव्हा ‘माझे सर्व कष्ट दूर झाले’, असे मला वाटले. (त्या वेळी पू. आजींच्या डोळ्यांत भावाश्रू आले.) मी आश्रमातील सर्व कार्य पाहिले. तुम्ही पुष्कळ मोठे आणि महत्त्वाचे कार्य केले आहे. मला त्याचे पुष्कळ कौतुक वाटते. तुमचा परिवार सामान्य नाही. (समाप्त)