हुब्बळ्ळी, कर्नाटक येथून श्रीमती सीताबाई श्रीधर जोशी (२०२५ चे वय ९९ वर्षे) सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या समवेत त्यांची कन्या श्रीमती मीरा करी (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ६७ वर्षे), जोशीआजी यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सूनबाई आल्या होत्या. त्याचसमवेत जोशीआजी यांचे नातजावई श्री. विनायक शानभाग (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आणि वय ४२ वर्षे) आणि नात सौ. विद्या शानभाग हेही होते. या सर्वांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला.

सत्संगात झालेले संभाषण पुढे दिले आहे. यानंतर दोनच दिवसांनी रामनाथी आश्रमात श्रीमती सीताबाई जोशी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्या ‘सनातनच्या १०० व्या संत’ म्हणून संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. (भाग १)

१. ‘भगवंत भेटणे सोपे नाही’, असे पू. सीताबाई जोशी यांनी म्हटल्यावर ‘साधना पुष्कळ झाली असेल, तर भगवंत भेटतो’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : नमस्कार आजी !
पू. सीताबाई जोशी : आमचे भाग्य थोर आहे; कारण आम्हाला तुम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), म्हणजे साक्षात् भगवंत मिळाला आहे ! भगवंत भेटणे सोपे नाही. ते अती कठीण आहे. आम्हाला तुम्ही मिळाला आहात !

परात्पर गुरु डॉ. आठवले : भगवंत भेटणे कठीण आहे; पण साधना पुष्कळ झाली असेल, तर भगवंत भेटतो !
२. पू. सीताबाई जोशी यांनी केलेल्या साधनेविषयी अत्यंत जिज्ञासूपणाने जाणून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
२ अ. पू. सीताबाई जोशी यांना साधनेविषयी काही ज्ञात नसतांना आंतरिक भक्तीमुळे त्या साधनेकडे वळणे
पू. सीताबाई जोशी : ‘मी संसार केला नाही’, असे नाही. मला ६ मुली आणि १ मुलगा अशी ७ मुले आहेत; परंतु त्या संसारात माझे मन रमत नव्हते. माझे मन सतत भगवंतामध्येच रमत होते. त्यामुळे माझ्या यजमानांनी मला सांगितले, ‘‘तू तुझा मार्ग पकडून पुढे जा. मी माझ्या पद्धतीने रहातो.’’ नंतर कितीही अडथळे आले, तरी मी कीर्तने आणि प्रवचने ऐकण्यासाठी जाऊ लागले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो; पण ही साधना तुम्हाला कुणी शिकवली ? इतरांना सर्व शिकवावे लागते. ‘साधना म्हणजे काय ? भक्ती म्हणजे काय ?’, हे सर्व सांगावे लागते आणि ‘साधना अन् भक्ती करा’, असे मागे लागावे लागते. तुम्हीच स्वतःच हे सर्व कसे केले ?
पू. सीताबाई जोशी : आतूनच माझी भक्ती आपोआप जागृत होत होती.

२ आ. होमिओपॅथीच्या उपचारांसह अध्यात्मावर मार्गदर्शन करणारे होमिओपॅथी डॉक्टर शिवा शिंदगी पू. आजींच्या जीवनात येणे
सौ. पुष्पा जोशी (पू. आजींच्या सूनबाई) : आजींचे नेहमी काही आजारपण चालू असायचे. त्यामुळे त्या वैद्यकीय उपचारांसाठी हुब्बळ्ळी येथील होमिओपॅथी डॉक्टर शिवा शिंदगी यांच्याकडे जायच्या. डॉ. शिंदगी हे केवळ डॉक्टर नव्हते, तर पुष्कळ चांगले साधकही होते. रुग्ण तपासून झाल्यानंतर कुणी जिज्ञासू आले, तर ते त्यांना अध्यात्म शिकवायचे. ते आदि शंकराचार्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान, तसेच सांसारिक बंधने यांविषयीची प्रवचने करायचे. आजी त्यांच्याकडे गेल्या की, १ – २ घंटे ध्यानाला बसायच्या. त्या जवळजवळ ८ वर्षे डॉ. सिंदगी यांच्याकडे जात होत्या.
सौ. विद्या शानभाग (पू. आजींची नात) : डॉ. शिंदगी वेगवेगळ्या परीक्षा घ्यायचे. त्यामध्ये आजी उत्तीर्ण होत गेल्या.
पू. सीताबाई जोशी : भक्ती किंवा साधना करायला मला कुणी सांगितले नव्हते. ते माझ्या अंतरंगातच होते. डॉ. शिंदगी यांच्या रूपाने मला एक सत्पुरुष लाभले. त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता. त्यांनी मला साधना शिकवली. त्यांनी मला दत्तगुरूंविषयीचे ज्ञान प्रदान केले. ते माझी परीक्षा घेत. त्यांनी माझ्या कठोर परीक्षा घेतल्या.
२ इ. ‘गुरुसान्निध्यात न रहाताही पू. आजींनी आध्यात्मिक उन्नती करून घेतली’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : अन्य अनेक शिष्य असतात. त्यांना साधना करायला पुष्कळ वेळ लागतो. ३० ते ४० वर्षे साधना केल्यानंतर ते साधनेत पुढे जातात. ते गुरुसान्निध्यात रहातात. त्यामुळे त्यांना गुरूंचे मार्गदर्शनही मिळते. तुम्हाला गुरुसान्निध्यही मिळाले नाही, तरी तुम्ही केवळ ७ – ८ वर्षे इतक्या अल्प कालावधीत साधना करून एवढी आध्यात्मिक उन्नती कशी करून घेतली ?
पू. सीताबाई जोशीआजी : मला साधनेविषयी पूर्ण मार्गदर्शन मिळाले नाही. नंतर मी हेब्बळ्ळी (जि. धारवाड, कर्नाटक) येथे गेले. तेथील दत्तावधूत गुरुजी हे गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य होते. १ वर्षभर मी त्यांच्याकडे जात होते. त्यांच्याकडून मला साधना शिकायला मिळाली.
श्रीमती मीरा करी (पू. आजींच्या कन्या) : पू. आजी नेहमी वरदहळ्ळी (जि. शिवमोग्गा, कर्नाटक) येथे श्रीधरस्वामी यांच्याकडे जायच्या. तेथे त्या ९ वर्षे जात होत्या.
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे लाखो भक्त असतात. काही जण आयुष्यभर संतांकडे किंवा मंदिरात जातात; परंतु त्यांच्यापैकी किती जण साधनेत पुढे जातात !

२ ई. पू. आजींनी संन्यास घेतलेल्या त्यांच्या भाच्यासमवेत ‘दोड्डेरी’ नावाच्या दत्ताश्रमात जाणे आणि अन्य साधकांचे निरीक्षण करून साधेनेचे प्रयत्न करणे
सौ. पुष्पा जोशी : पू. आजींचे एक मावसभाऊ होते. त्यांच्या मुलाला लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. तो नेहमी आजींसमवेत अध्यात्म आणि धर्म विषयक चर्चा करायचा. ते दोघे ध्यानाला बसायचे. भजनही करायचे. नंतर त्यांच्या भाच्याने संन्यास घेतला. पू. आजींचे यजमान वारले. तेव्हा हा भाचा भेटायला आला होता. परत जातांना त्याने पू. आजींना समवेत नेले. कर्नाटकात चित्रदुर्गजवळ ‘दोड्डेरी’ नावाचे एक क्षेत्र आहे. तेथे दत्ताश्रम आहे. आश्रमात राहून तो साधना करतो. आता तो पू. आजींचा गुरुबंधू आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : शिष्य गुरूंसमवेत रहातात, तरी त्यांची प्रगती होत नाही; परंतु तुम्ही इतकी प्रगती कशी करून घेतली ? भगवंताची भक्ती कशी केली ?
पू. सीताबाई जोशीआजी : आश्रमात गुरुजी सर्व भक्तांना सांगायचे, ‘यांच्यामध्ये (पू. आजींमध्ये) पुष्कळ भक्ती आहे.’ इतर सर्व साधकांचे निरीक्षण करून मी त्यानुसार प्रयत्न करू लागले.
२ उ. सांसारिक बंधनांतून मुक्त होण्याची पू. आजींना असलेली तळमळ आणि देवाप्रती असलेली त्यांची शरणागत वृत्ती !
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे पू. आजी दैवी बालिका होत्या का ? लहान वयात आश्रमापर्यंत पोचणे त्यांना कसे शक्य झाले ?
श्रीमती मीरा करी : पू. आजींना संसारिक जीवनात पुष्कळ कष्ट सोसावे लागले. त्या वेळी त्या देवाचे चरण घट्ट धरून संसारातून बाहेर काढण्यासाठी देवाजवळ रडायच्या. देवाला शरण जाऊन त्या आर्ततेने विनवणी करायच्या. त्या ‘सत्संगाला जाणे, संतांकडे जाणे, त्यांचे मार्गदर्शन ऐकणे’, असे सर्व भावपूर्णरित्या करायच्या. संतांना घरी आमंत्रित करून त्यांची पाद्यपूजा करणे आणि अन्नदान करणे, असेही त्या नेहमी करायच्या. त्यांना जो आनंद घरात मिळत नव्हता, तो त्यांना प्रवचने आणि कीर्तने ऐकून, सत्संगाला जाऊन, तसेच संतांकडून मिळू लागला. त्या अत्यंत एकाग्रतेने नामजप करायच्या आणि अंतर्मनापासून ईश्वराला शरण जायच्या. त्या सर्व व्रतवैकल्ये अत्यंत धार्मिकतेने आणि दृढ श्रद्धेने करायच्या. या सगळ्यांतून त्यांची साधना होत गेली. त्या जे जे धार्मिक कुलाचार करायच्या, ते सर्व आम्हाला धार्मिकतेचा वारसा म्हणून त्यांच्याकडून मिळाले आहेत. जे जे कुलाचार पू. आजींनी केले, ते सर्व कुलाचार आता माझा भाऊ आणि वहिनी नित्यनियमाने करत आहेत.
(क्रमशः)
या लेखातील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/900346.html