
मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी निर्णय झाले होते. त्यानुसार कार्यवाही झाली नाही; परंतु राज्यातील हॉटेल, पेट्रोलपंप, महामार्गांवरील हॉटेल, ढाबे या ठिकाणांवर प्रवाशांसाठीची स्वच्छतागृहांची उभारणी दर्शनी भागांमध्ये करण्याची सूचना करण्यात येईल, तसेच कुणी खोडसाळपणे ही स्वच्छतागृहे आडबाजूला, पाठीमागे निर्माण केल्यास, तसेच स्वच्छता न ठेवल्यास अशा सर्वांना नोटिसा पाठवून कारवाई करू, अशी चेतावणी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. भाजपच्या चित्रा वाघ यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली होती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले की,
१. महामार्गावर २५ किलोमीटर अंतरावर १ स्वच्छतागृह उभे करण्यात येईल. त्याची देखभाल, दुरुस्ती ही स्थानिक महिला बचत गट किंवा सामाजिक संस्था यांना चालवण्यास देण्यात येईल. त्या ठिकाणी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्रीही करता येईल.
२. आमच्या विभागातील अधिकारी १५ दिवसांतून १ वेळ भेट देऊन तेथील पहाणी करतील. सुरक्षा व्यवस्था, सोयी-सुविधा कशा प्रकारे दिल्या आहेत ? त्याची पडताळणी करतील.
३. या सर्व स्वच्छतागृहांतील समस्या मांडण्यासाठी एक ‘क्यूआर’ कोड (क्वीक रिसपॉन्स कोड – म्हणजे बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) सिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू.