गोवा विद्यापिठाची प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण
पणजी, १९ मार्च (वार्ता.) – गोवा विद्यापिठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या प्रकरणी विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीला साहाय्य करण्यासाठी हा प्रकार केल्याचा साहाय्यक प्राध्यापकावर आरोप आहे. या प्रकरणी गोवा विद्यापिठाने नेमलेल्या तथ्य शोधक समितीने तिचा अहवाल विद्यापिठाचे उपकुलगुरु प्रा. हरिलाल मेनन यांना १९ मार्च या दिवशी सुपुर्द केला आहे. हा अहवाल पुढील कारवाईसाठी गोवा विद्यापिठाच्या कार्यकारी मंडळाकडे सुपुर्द केला जाणार असल्याची माहिती विद्यापिठाचे प्रबंधक सुंदर धुरी यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार या प्रकरणी गोवा विद्यापिठाने केलेल्या प्राथमिक अन्वेषणात काही अप्रिय घडले नसल्याचे निष्पन्न झाल्याचे समजते. विद्यापिठाची प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरणी आगशी पोलीस ठाण्यात यापूर्वीच तक्रार प्रविष्ट झालेली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आगशी पोलिसांनी १९ मार्च या दिवशी विद्यापिठाचे संबंधिक विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे अन्वेषण केले. आगशी पोलिसांनी या प्रकरणी गोवा विद्यापिठाचे उपकुलगुरु प्रा. हरिलाल मेनन यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडून याविषयी माहिती घेतली.
उपलब्ध माहितीनुसार उपकुलगुरु प्रा. हरिलाल मेनन यांनी या प्रकरणी प्रश्नपत्रिका चोरी झाली नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी अपेक्षित पुरावे न मिळाल्याने संबंधित प्राध्यापकाचे निर्दाेषत्व सिद्ध होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ‘एन्.एस्.यु.आय.’(नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडीया) ही विद्यार्थी संघटना आणि ‘इंडियन युथ काँग्रेस’ यांनी १९ मार्च या दिवशी गोवा विद्यापिठाचे कुलगुरु आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन हे प्रकरण गंभीरतेने घेण्याची मागणी केली आहे. राज्यपाल श्रीधरन् पिल्लई यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेणार असल्याची ग्वाही विद्यार्थी संघटनेला दिली.