श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या पूजेची २५ मार्चपासून ‘ऑनलाईन’ नोंदणी ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी

श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीदेवी

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदनउटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील पूजांची ‘ऑनलाईन’ नोंदणी २५ मार्चपासून होणार आहे, अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. भाविकांना  https://www.vitthalrukminimandir.org यावर नोंदणी करता येणार आहे.

‘ऑनलाईन’ नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास साहाय्य आणि आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याविषयीची अधिक माहिती, अटी आणि शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.

गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठलाची चंदनउटी पूजा ! 

ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठ्ठलाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याचा प्रारंभ होईपर्यंत प्रतिदिन दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे, या चंदनउटी पूजेची नोंदणीही ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी या वेळी सांगितले आहे.

विविध पूजांचे दर ! 

श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे २५ सहस्र आणि ११ सहस्र रुपये, पाद्यपूजेसाठी ५ सहस्र रुपये, तर तुळशी अर्चन पूजेसाठी २१ सहस्र रुपये घेण्यात येईल. श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीदेवीच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे २१ सहस्र रुपये आणि ९ सहस्र रुपये इतके देणगीमूल्य आकारण्यात येणार आहे.