हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्‍या तिघांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड 

पणजी – हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्‍यांना उत्तर गोवा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अन् न्यायनिर्णय अधिकारी यांनी प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी मंगळुरू, कर्नाटक येथील ‘मे. शैलेंद्र ऋषि राज इंडस्ट्रीज इंडिया (आय) प्रा. लि.’चे रजनीश; खोर्ली, तिसवाडी येथील घाऊक विक्रेते गंगाधर पुजारी (‘मे. गंगा एंटरप्रायझेस’) आणि रईस मागोस, बार्देश येथील किरकोळ विक्रेते प्रवीण कुमार (मे. बालाजी सुपर मार्केट) यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

या तिघांनी विक्री केलेल्या आले-लसूण मिश्रणामध्ये (‘पेस्ट’मध्ये) ‘ॲसिटिक ऍसिड‘चे प्रमाण ०.५५ टक्के आढळले, जे अन्न सुरक्षा मानकांनुसार अनुमती दिलेल्या मर्यादेपेक्षा न्यून आहे. यामुळे उत्पादनाचा दर्जा निकृष्ट ठरला. अन्न सुरक्षा अधिकारी सुजाता शेटगावकर यांनी न्यायनिर्णय अधिकारी यांच्याकडे खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने दिली आहे.