सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – रायगड विकास प्राधिकरणाकडून पाचाड (जि. रायगड) येथील राजमाता जिजाऊ समाधीस्थळाचा विकास करण्यात येत आहे. या प्राधिकरणासाठी ६०६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. येथे होत असलेल्या विकासकामांचा आढावा प्रत्येक २ महिन्यांनी घेतला जातो. निधीअभावी कामे थांबलेली नाहीत, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की,
१. पूर्वी ती समाधी वन विभागाकडे होती. सध्या भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. टप्प्याटप्प्याने विकास होत आहेत.
२. जिजाऊ माता यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे ‘जिजाऊ सृष्टी’ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.
३. समाधीस्थळांवर प्रत्यक्षात किती निधी व्यय केला ? केलेल्या विकासकामांचा दर्जा आणि मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. त्याविषयी बैठक लवकरच घेऊ.
उत्तराविषयी आक्षेप ! – प्रवीण दरेकर
या उत्तराला प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘राजमाता जिजाऊ समाधीस्थळाची सध्या दुरवस्था झाली आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आणि शिवभक्त यांना मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत हे खरे आहे. अनेक वेळा वीजदेयक न भरल्यामुळे तेथील वीजपुरवठा खंडीत केला जातो.’’