अग्नीकाष्ठासह दहनासाठीचे साहित्य विनामूल्य ! – सुधीर एकांडे, वैकुंठधाम सुधार समिती

वैकुंठधाम स्मशानभूमी, कराड

कराड, १९ मार्च (वार्ता.) – येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अग्नीकाष्ठ सरपणात केल्या जाणार्‍या दहनासाठी इतर साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘वैकुंठधाम सुधार समिती’चे सचिव सुधीर एकांडे यांनी दिली. वैकुंठधाम सुधार समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी समितीचे अध्यक्ष विनायक पावसकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण रक्षण हा उद्देश ठेवून वैकुंठधाम सुधार समिती आणि कराड नगरपालिका यांच्या सहकार्याने दहनासाठी मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीला आळा बसावा; म्हणून काही उपक्रम हातात घेण्यात आले होते. यामध्ये पालापाचोळा, शेंगांची फोलकटे, शेण आणि मळीची माती या पर्यावरणपूरक पदार्थांतून अग्नीकाष्ठ बनवण्यात आले. गत २ वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. आतापर्यंत शहरातील ५५० मृतदेहांचे दहन अग्नीकाष्ठ सरपणात झाले आहे. १ जानेवारी २०२४ पासून कराड नगरपालिकेने अग्नीकाष्ठ सरपणात झालेले दहन विनामूल्य केले आहे. दहनासाठी आजपर्यंत केवळ सरपण विनामूल्य देण्यात येत होते; मात्र १५ मार्च २०२५ पासून दहनाला आवश्यक अन्य साहित्य कापड, सुतळी, मडके, कापूर, हळद-कुंकू, गुलाल आणि बुक्का विनामूल्य देण्यात येणार आहे. ही सवलत कराड नगरपालिकेचा कर भरणार्‍या आणि अग्नीकाष्ठ सरपणात होणार्‍या दहनासाठी उपलब्ध आहे.