
स्टॅलिन यांच्या तमिळनाडू सरकारने नोटेवरील रुपयाचे चिन्ह पालटून ते तमिळ भाषेत ‘रुबई’(तमिळमध्ये रुपये)मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टीका करत ‘ही धोकादायक मानसिकता आहे’, असे सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की, सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी राष्ट्राचे सार्वभौमत्व अन् अखंडता राखण्यासाठी शपथ घेतात. राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून ‘रु’सारखे राष्ट्रीय चिन्ह काढणे, हे त्या शपथेविरुद्ध आहे. स्टॅलिन यांनी याविषयी एक लघुपट (टीझर) जारी करून नवीन चिन्ह कसे असेल ? हे दाखवले आहे. हिंदी विरोधाच्या नावाखाली त्यांनी टोकाची देशविरोधी भूमिकाच घेतली आहे, हे यातून लक्षात येते. त्यांच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी संसदेच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाच्या विरुद्ध निदर्शने केली होती. यामध्ये तीन भाषांच्या आडून हिंदी भाषा तमिळी लोकांवर लादण्यात येत आहे, यासाठी निषेध केला आहे. केवळ हिंदी विरोधामुळे तमिळनाडू राज्य पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
सुंदर पिचाई हिंदी शिकले !

तमिळनाडूतील द्रमुक अथवा अण्णाद्रमुक पक्षांकडून होणारा हिंदी विरोध भारतास चांगला परिचयाचा आहे. पेरियार यांच्यापासून चालू झालेला हा हिंदी विरोध थांबण्याचे नाव घेत नाही. हिंदी विरोधाला पेरियार यांची मानसिकता असलेले त्यांचे वंशज पक्ष खतपाणी घालत आहेत आणि आता तर राष्ट्रीय चलनालाच त्यांनी हात घालून घात केला आहे. ‘आम्ही हिंदीविरोधासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो’, हेच यातून स्टॅलिन यांनी दाखवून दिले आहे. तमिळ भाषेच्या रक्षणाच्या नावाखाली घेतलेले निर्णय ते सहसा पालटत नाहीत. त्यांचे ते कडवेपणाने समर्थन करतात, तसेच मुख्य म्हणजे त्यांना तमिळनाडूतील स्थानिक पक्षांचेही सहकार्य असल्यामुळे त्या विरोधात आवाज उठत नव्हता. आता भाजपचे तेथील नेते अण्णामलाई यांनी स्टॅलिन यांच्या हिंदीविरोधी धोरणाविषयी आवाज उठवण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी ‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात सुंदर पिचाई उपस्थितांना सांगतात, ‘मी चेन्नई येथे शाळेत असतांना कधीतरी हिंदी शिकण्याशी माझा संबंध आला. मी हिंदी समजू शकलो; मात्र बोलू शकलो नाही.’ हा विषय घेऊन ‘पोस्ट’मध्ये अण्णामलाई लिहितात, ‘मी द्रमुकच्या मंत्र्यांच्या मुलांनी शाळेत ३ भाषा शिकण्याविषयीच्या निरर्थक वादाविषयी विचारल्यावर मंत्री थिरू पीटीआर् पलानीवेल थिआगाराजन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शाळेत द्विभाषा धोरण असतांना शिकला. त्यांनी भाषांचा उल्लेख केला नाही. त्या भाषा आहेत एक म्हणजे इंग्रजी आणि दुसरी फ्रेंच किंवा स्पॅनिश ! हेच तमिळनाडू सरकारचे द्विभाषा धोरण आहे का ? आम्ही सरकारला विचारतो की, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि तमिळच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा म्हणून भारतीय भाषा शिकण्यापासून का रोखण्यात येत आहे ? द्रमुक नेत्यांनी चालवलेल्या खासगी शाळा हिंदी भाषा शिकवतात; मात्र सरकारी नाही !’
केवळ पोटासाठी हिंदी ?
हाच प्रश्न अन्य भारतियांनाही पडला आहे की, एवढा टोकाचा विरोध का करण्यात येत आहे ? या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तमिळनाडू सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. त्यांनी सांगितले, ‘तमिळ चित्रपट हिंदीत ‘डब’ करून भारतभरातून पैसे का कमावता ? त्यांना बॉलीवूडकडून पैसे हवे असतात; पण हिंदी स्वीकारण्यास नकार देतात. हा कसला तर्क आहे ?’ एकूणच तमिळनाडूच्या आंधळ्या आणि ढोंगी भाषाप्रेमाला चांगला विरोध होत आहे. स्टॅलिन पिता-पुत्र दोघेही हिंदु धर्म आणि हिंदी भाषा यांना टोकाचा विरोध करून तमिळनाडूमध्ये फुटीची बिजे रोवत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य तमिळ जनतेलाही भोगावा लागत आहे; कारण त्यांना तमिळ आणि इंग्रजी यांच्या व्यतिरिक्त अन्य भारतीय भाषाच येत नाही. त्यामुळे उर्वरित भारताशी त्यांची नाळ भक्कमपणे कधीच जोडली जाणार नाही. संपर्काचे आणि समन्वयाचे मूळ माध्यमच भाषा असेल, तर पुढील संवाद सुरळीत होईल कसा ? स्वत:च्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तोडकी-मोडकी हिंदी भाषा वापरण्यात येते; मात्र ती भारताची भाषा म्हणून नव्हे, तर उद्योग-व्यवसायावर संकट येऊ नये म्हणून. यापूर्वीच्या केंद्र सरकारने अनेक वर्षे जाणीवपूर्वक भिजत ठेवलेल्या प्रश्नावर धडक कृती करण्याची आणि तमिळ जनतेने केंद्राला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ‘द्रमुकसारखे हिंदी आणि हिंदुद्वेषी पक्ष तमिळनाडूला स्वतंत्र राष्ट्र घोषित करतील’, याचा काही नेम नाही !
तमिळनाडूचा हिंदी भाषा आणि हिंदु द्वेष मोडून काढण्यासाठी केंद्रशासन पावले केव्हा उचलणार ? |