Sambhal Neja Mela : संभल (उत्तरप्रदेश) येथे दरोडेखोर मसूद गाझीच्या स्मृतीप्रीत्यर्थ होणार्‍या ‘नेजा मेळ्या’ला अनुमती नाकारली !

असा उत्सव साजरा करणार्‍यांना देशद्रोही घोषित करण्याची पोलिसांची चेतावणी

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची अनुमतीसाठी भेट घेताना ‘नेजा मेळा’ समितीचे सदस्य

संभल (उत्तरप्रदेश) – आक्रमणकर्त्या महंमद गझनीचा दरोडेखोर सेनापती सय्यद सालार मसूद गाझी याच्या नावाने उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात आयोजित होणार्‍या  ‘नेजा मेळ्या’ला अनुमती नाकारण्यात आली आहे. सोमनाथ मंदिर लुटणार्‍या आणि भारतात लूट आणि हत्याकांड घडवणार्‍या दरोडेखोरांच्या स्मरणार्थ कोणताही मेळा आयोजित करू नये, असा सल्ला संभलच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी ‘नेजा मेळा’ समितीला दिला. ते म्हणाले की, आपण आतापर्यंत दरोडेखोराच्या नावाखाली मेळा भरवून गुन्हे करत आला आहात; पण आता हे सहन केले जाणार नाही.

१. सय्यद सालार मसूद गाझी हा विदेशी आक्रमणकर्त्या महंमद गझनीचा पुतण्या आणि सेनापती होता. गझनीने इसवी सन १ सहस्र ते १ सहस्र २७  या काळात १७ वेळा भारतावर आक्रमण केले होते. या काळात त्याने हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरासह अनेक मोठ्या मंदिरांवर आक्रमण केले होते.

२. संभलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीशचंद्र यांनी ‘नेजा मेळा’ समितीच्या लोकांना सांगितले की, या दरोडेखोराच्या नावाने जो कुणी मेळा आयोजित करेल, त्याला देशद्रोही म्हणून वर्गीकृत केले जाईल. ‘नेजा मेळा’ ही एक वाईट प्रथा आहे. कोणत्याही दरोडेखोराच्या नावाने मेळा भरवणे पूर्णपणे चुकीचे आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल.

३. यापूर्वी ‘नेजा मेळा समिती’च्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ. बंदना मिश्रा यांचीही भेट घेतली होती. या समितीने त्यांच्याकडे मेळा आयोजित करण्याची अनुमती मागितली होती; परंतु जिल्हाधिकार्‍यांनी ‘नेजा मेळ्या’ला अनुमती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

संपादकीय भूमिका

अशा उत्सावाला आतापर्यंत काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आदींनी कधीही विरोध केला नाही, उलट तो होण्यासाठी साहाय्य केले, हे लक्षात घ्या !