परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून त्यांनी घेतलेल्या संतांच्या भेटीच्या वेळी साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

‘वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर गोव्याहून एका सेवेसाठी नाशिक येथे आले होते. तेव्हा त्यांनी प.पू. पत्कीकाका यांच्या समवेत प.पू. बेजन देसाई यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्या वेळी एका सेवेनिमित्त मी तेथे उपस्थित होतो. त्या प्रसंगी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. राम होनप

१. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे कर्मबंधनांच्या पलीकडे गेले आहेत’, हे दर्शवणारा एक प्रसंग ! 

परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. पत्कीकाका हे प.पू. बेजन देसाई यांच्या घरी गेले. तेथे प.पू. बेजन देसाई यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आदरातिथ्य करतांना ‘‘काय घेणार ?’, असे विचारले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आता आत्मानंदाची स्थिती आहे. त्यामुळे कर्माचे बंधन राहिले नाही. मला काहीही दिले, तरी चालेल.’’ त्यानंतर प.पू. बेजन देसाई यांनी त्यांना नेहमीचा अल्पाहार दिला.

परात्पर गुरु डॉक्टरांनी नेहमी शाकाहारच केला. ‘ईश्वरप्राप्ती झाली की, संत पाप-पुण्य अशा कर्मांच्या पलीकडे गेलेले असतात’, हे सांगण्यासाठी वरील प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टर ‘मला काहीही दिले, तरी चालेल’, असे म्हणाले होते.

२. साधकाने ‘जाणूनि श्रींचे मनोगत !’, यानुसार गुरुसेवा करणे महत्त्वाचे असणे 

परात्पर गुरु डॉक्टरांची संतांशी भेट चालू असतांना प.पू. पत्की यांनी प्रेमाने प.पू. बेजन देसाई यांचे दोन्ही चरण स्वतःच्या मांडीवर काही वेळ घेतले होते. त्या वेळी तिन्ही संत आपापसांत काही वेळ बोलत होते. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी तेथे छायाचित्रे काढण्याच्या सेवेसाठी उभा असलेल्या साधकाला विचारले, ‘‘प.पू. पत्की यांनी प.पू. बेजन देसाई यांचे दोन्ही चरण स्वतःच्या मांडीवर घेतले होते. या क्षणाचे छायाचित्र काढले ना ?’’ तेव्हा त्या साधकाने ‘‘नाही’’, असे उत्तर दिले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्या साधकाला कठोर शब्दांत म्हणाले, ‘‘आपण त्या प्रसंगाचे छायाचित्र न काढल्याने दुर्मिळ क्षण गमावला आहे. अशा घटना परत परत घडत नाहीत. अशा चुकांमुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही.’’

या प्रसंगात माझ्या मनात विचार आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यावर ती सेवा साधकाने केली, तर त्यातून साधकाची साधना होते; पण त्यांनी न सांगताही ‘गुरूंना काय आवडेल ?’, असा विचार करून स्वतःहून ती कृती केल्यास ही सेवा आणखी पुढील टप्प्याची, म्हणजे ‘जाणूनि श्रींचे मनोगत !’, यानुसार होते. त्यामुळे साधकावर गुरुकृपा लवकर होते आणि साधकाची जलद आध्यात्मिक प्रगती होते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०२५)