४ विद्यार्थिनी मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे उघड; विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !

  • पुणे विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहातील धक्कादायक प्रकार !

  • तक्रारीनंतरही प्रशासन निष्क्रीय !

  • सिगारेटची शेकडो पाकिटे, तसेच दोन बॅगा मिळून मद्याच्या बाटल्या जप्त !

खोलीमधील मद्याच्या बाटल्या, तसेच सिगारेटची शेकडो पाकिटे

पुणे – येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ४ विद्यार्थिनी मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे उघड झाले आहे. वसतीगृहातील एका खोलीमध्ये मद्याच्या बाटल्या, तसेच सिगारेटची शेकडो पाकिटेही आढळून आली. त्या खोलीत रहाणार्‍या एका विद्यार्थिनीने छायाचित्रे आणि व्हिडिओ यांद्वारे हा प्रकार उघड केला. संबंधित विद्यार्थिनीने ही माहिती वसतीगृह महिला अधिकारी यांना अनेकदा देऊनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. संबंधित विद्यार्थिनीने कुलसचिव आणि उपकुलगुरु यांना पत्र लिहून तिच्या खोलीत ४ विद्यार्थिनी मद्यप्राशन करून सिगारेट ओढत असल्याची माहिती एका अर्जाद्वारे कळवली; मात्र वसतीगृह प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. मद्यप्राशन करणार्‍या विद्यार्थिनींचे शेवटचे २ महिने शेष असल्याचेे सांगून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे टाळल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रकरणी २ मोठ्या बॅगा भरून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

‘मला कल्पना नाही !’ – उपकुलगुरु यांचे स्पष्टीकरण

विद्यार्थिनीने अनेकदा तक्रार करूनही त्याची कल्पना नसल्याचे उपकुलगुरु कसे म्हणू शकतात ?

उपकुलगुरु डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‘‘याविषयी मला कोणतीही कल्पना नाही. या प्रकरणी माहिती घेऊन संबंधित विभागाला पुढील कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील.’’

कारवाई न केल्यास अभाविपची आंदोलनाची चेतावणी !

या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सांगण्यात आले, ‘‘वसतीगृहाच्या प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक असूनही नशेच्या वस्तू आत कशा पोचतात ?  कर्मचारीच या गोष्टी पुरवतात का ?, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या तक्रारीची नोंद न घेता तिच्यावरच उलट दबाव आणला गेला. या प्रकरणाची चौकशी व्हावी. तसेच विद्यार्थिनीवर दबाव आणणार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. एक पुरुष प्राध्यापक मुलींच्या वसतीगृहात विनाअनुमती गेल्याचेही उघडकीस आले आहे. त्यांचीही चौकशी व्हावी. या प्रकरणी योग्य ती कारवाई न केल्यास, तसेच विद्यापिठाचा परिसर नशामुक्त होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.’’

संपादकीय भूमिका

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात, तेही पुणे विद्यापिठात अशा गोष्टी घडणे पुणेकरांसाठी लांच्छनास्पद ! मद्यप्राशनावर आळा घालण्यात वसतीगृह प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. एवढ्या गंभीर प्रकरणाची वारंवार तक्रार करूनही कारवाई न करणार्‍या संबंधित सर्व अधिकार्‍यांना बडतर्फ करायला हवे !