नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

कौरवांनी पांडवांना निदान ५ गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल; म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वत: दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले. त्या वेळी दुर्योधनाने सांगितले, ‘देवा, तू म्हणतोस ते सर्व योग्य आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काही तरी करणे जरूर आहे; पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही, त्याला मी काय करू ? तू सर्वसत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट, म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल !’; परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले, हे प्रसिद्धच आहे. तीच स्थिती रावणाविषयीही दिसते; म्हणून सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही, असे दिसते. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालबाधित असणार्‍या नामावताराची आता आवश्यकता आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया.

एका माणसाची प्रकृती बरी होती; पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाले की, जीव वाचवायचा असेल आणि बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल, तर पाय कापायला हवा. आता नुसता प्राण आहे; पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही; पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट बाकी सगळे आहे; पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे; पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली, तर चालू शकेल. समजा कानाने ऐकू येत नाही, तर नाही ! कुठे बिघडले ? उपासना, अनुसंधान, हे प्राणासारखे समजावे; बाकी व्याप आहे, तो शरिराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले, तर प्राणच गमावल्यासारखे आहे; ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे आवश्यक आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या, तर अंती निराशा आहे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज