Vineet Kumar On Shooting Chhaava Climax : ‘छळाच्या दृश्यांमध्ये खर्‍या वेदना दाखवल्या असत्या, तर लोक ते सहन करू शकले नसते !’

‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनीत कुमार सिंह यांचे वक्तव्य

‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनीत कुमार

मुंबई – ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा केलेला छळ अल्प प्रमाणातच दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील शेवटच्या ३० मिनिटांत प्रेक्षकांना जे पहायला मिळाले, ते मोठ्या पडद्यावर दाखवणे सहसा सोपे नसते. चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार पाहून सर्वांनी डोळे मिटले होते. छळाच्या क्रौर्यतेची दृश्ये वास्तवाला धरून दाखवली असती, तर कदाचित् लोक ते पाहू शकले नसते, असे वक्तव्य ‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनीत कुमार सिंह यांनी केले. या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

अभिनेते सिंह पुढे म्हणाले की,

१. चित्रपटाचे चित्रीकरण चालू करण्यापूर्वी मी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधी स्थळाला भेट दिली होती. मी तिथे अर्धा दिवस घालवला. तेथील बर्‍याच लोकांशी बोललो. काही वृद्ध लोक तिथे बर्‍याच दिवसांपासून रहात होते. त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या.

२. तुम्ही एका महिन्यापेक्षा अधिक काळ एखाद्यावर अत्याचार करत आहात, जर तुम्ही त्याच्यावर गोळी झाडली, तर तुम्हाला काय दिसेल, हे समजते का ? मी डॉक्टर आहे. अत्यंत गंभीर अपघातांनंतर लोकांना आपत्कालीन वॉर्डमध्ये येतांना मी पाहिले आहे. जेव्हा आपण त्यांच्या जखमांवर ‘अँटीसेप्टिक’ लावतो, तेव्हा ते विव्हळत ओरडतात. अस्थीभंगावर उपचार करतांना लोक वेदनेने ओरडत असतात.

३. ‘छावा’मध्ये तुम्हाला दिसते की, उघड्या जखमांवर मीठ चोळले जात आहे. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट द्यायला जा. तेथील लोक तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगतील. चित्रपट चालू होण्यापूर्वी मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तेथे गेलो होतो.