मंगळ ग्रहावर चालणारा आणि भूमी, हवामान यांचा अंदाज घेणारा रोव्हर सिद्ध करून स्पर्धा जिंकली !

पलूस (जिल्हा सांगली), ३ मार्च (वार्ता.) – गोवा येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रोव्हर सिद्ध करण्याच्या स्पर्धेत पलूस येथील कु. केदार प्रदीप वेताळ याने महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संघाने मंगळ ग्रहावर चालणारा आणि भूमी, हवामान यांचा अंदाज घेणारा रोव्हर सिद्ध करून स्पर्धा जिंकली. या नवीन सिद्ध केलेल्या ‘रोव्हर’ला अमेरिकेतील नासा संलग्न ‘द मार्स सोसायटी’ने २८ ते ३१ मे २०२५ या दिवशी आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. केदार वेताळ सध्या मणिपाल विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. त्याच्या संघास मंगळावर यशस्वी होऊ शकणार्या ‘रोव्हर’ची निर्मिती करून त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. केदार याने स्वतः ‘रोव्हर’चे डिझाईन केले आहे. त्याने डिझाईन केलेल्या ‘सस्पेशन’ला ‘पेटंट’ (बौद्धिक संपदा अधिकार) मिळाले आहे. हा रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वी चालून तेथील भूमी आणि हवामान यांचा अंदाज घेऊ शकणार आहे. त्यामुळे हा रोव्हर यशस्वी असल्याचे परीक्षकांनी घोषित केले. कु. केदार वेताळ हा पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रदीप आनंदराव वेताळ यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या यशाविषयी पलूस आणि परिसरातून कु. केदार याचे अभिनंदन होत आहे.