देशात अश्लील कृत्ये आणि इतर गुन्हे करण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अश्लील चित्रपट पाहून अल्पवयीन, तरुण आणि प्रौढ माणसे लहान मुली, तरुणी अन् महिला यांच्यावर अत्याचार करत आहेत. हे प्रमाण देशात पुष्कळ प्रमाणात वाढत आहे. भाग्यनगर (तेलंगाणा) येथे एका ३५ वर्षीय पित्याला अश्लील चित्रपट (पॉर्न) पहाण्याची सवय जडली होती. यामुळे त्याने त्याच्या पोटच्या १३ वर्षीय मुलीला एका अरण्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती आईला सांगण्याची धमकी तिने दिल्यावर पित्याने तिची हत्या केली. फेब्रुवारी २०२५ मध्ये रांची (झारखंड) येथे राज्यातील धनबाद जिल्ह्यात असलेल्या निचितपूर येथे एका विवाह समारंभातून घरी परतणार्या ५ अल्पवयीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला. २४ एप्रिल २०२४ या दिवशी मध्यप्रदेशातील रीवा येथे एका १३ वर्षांच्या मुलाने भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून स्वतःच्या ९ वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केला. २२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे एका ५ वर्षांच्या मुलीवर शेजार्याने बलात्कार केला. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
पॉर्न व्हिडिओ पहाणार्यांच्या संख्येत वाढ !

वर्ष २०२६ पर्यंत भारतात भ्रमणभाष वापरणार्यांची संख्या १२० कोटींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ‘पॉर्न हब’ या संकेतस्थळाने म्हटले आहे की, एकावेळी एक भारतीय पॉर्न संकेतस्थळावर सरासरी ८ मिनिटे ३९ सेकंद घालवतो. एवढेच नाही, तर पॉर्न पहाणारे ४४ टक्के लोक १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत, तर ४१ टक्के लोक २५ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत. गुगलने वर्ष २०२१ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये भारत सर्वाधिक पॉर्न पहाण्याच्या संदर्भात जगात सहाव्या क्रमांकावर आहे. ‘पॉर्न हब’ संकेतस्थळानुसार भारतीय तिसर्या क्रमांकावर आहेत. येथे महत्त्वाचे म्हणजे ‘पॉर्न’ आणि इतर अश्लील चित्रपट सतत पाहून लहान मुले अन् प्रौढ यांच्या मनावर विकृत परिणाम होतो. त्यामुळे समाजात वावरतांना अशा व्यक्तींना मित्र, नातेवाईक यांचे भान रहात नाही. ते नातेवाइकांमधील मुली आणि महिला यांच्याकडे अश्लीलतेने पहातात. त्यामुळे मुली आणि महिला यांच्यावर बलात्काराचे प्रमाण वाढत जाऊन अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडत आहेत.
सर्वाेच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता आशिष कुमार पांडे यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन अश्लील मजकूर वारंवार पाहिल्याने किशोरवयीन मुलांना ते सामान्य वाटू लागते आणि ते स्वतः काही प्रकारचे लैंगिक गुन्हे करण्यास प्रारंभ करतात. सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडिया) टोळी संस्कृती वाढली आहे. अल्पवयीन मुले बढाई मारण्यासाठी गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाशी संबंधित सामग्री शेअर करतात.
अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे !
पूर्व देहली गाझीपूर पेपर मार्केटच्या जवळ रहाणार्या एकाचा वाढदिवस होता. रात्री मद्य पिऊन मुलांनी बाजारात गोंधळ घातला. या वेळी अंडी विक्रेते रमेश दाताराम यांनी विरोध केला असता मुलांनी त्यांची हत्या केली. असाच प्रकार जल बोर्डाच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये झाला. रात्री १२ वाजता ३० वर्षीय पप्पू प्रसाद यांना अल्पवयीन मुलांनी लुटण्याचा प्रयत्न करून त्यांची हत्या केली. ही मुले १४ ते १७ वर्षे वयोगटातील होती. प्रतिवर्षी अल्पवयीन मुले ११ सहस्रांहून अधिक मोठे गुन्हे करतात. वर्ष २०२२ मध्ये अल्पवयीन मुलांकडून होणार्या गुन्ह्यांची सर्वाधिक ४ सहस्र ४०६ प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत, त्यानंतर मध्यप्रदेशात किशोरवयीन मुलांकडून ३ सहस्र ७९५, तर राजस्थानमध्ये ३ सहस्र ६३ गुन्हे घडले आहेत. बेरोजगारी, नैराश्य आणि दबाव हे घटकही गुन्हे वाढण्यास कारणीभूत आहेत. अमेरिकी समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट मार्टिन यांच्या ‘स्ट्रेन थिअरी’नुसार जेव्हा मुलांना त्यांचे अपेक्षित उद्दिष्ट किंवा काहीही मिळत नाही, तेव्हा ते मानसिक दबाव, राग आणि चिडचिडेपणा यांमुळे गुन्हे करतात. ‘देहली कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स’च्या म्हणण्यानुसार पकडलेल्या ७० टक्के अल्पवयीन मुलांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे परिणाम ठाऊक नव्हते ! गरिबी आणि अमली पदार्थांचे व्यसन किशोरांना गुन्हेगार बनवते. ‘एन्.सी.आर्.बी.’च्या अहवालानुसार वर्ष २०२२ मध्ये अटक करण्यात आलेल्या ३७ सहस्र ७८० अल्पवयीन आरोपींपैकी ३२ सहस्र ४३० जण कुटुंबासमवेत रहात होते. केवळ १ सहस्र ८४८ अल्पवयीन बेघर होते. यावरून असे लक्षात येते की, कुटुंबांतील लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे; कारण अशा मुलांना धर्मशिक्षण मिळाले नाही, आई-वडिलांकडून चांगले संस्कार झाले नाहीत. देहली येथील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. रोमा कुमार यांच्या मते नैतिक मूल्यांची घसरण, पालकांचा घटस्फोट, घरगुती हिंसाचार यांचा परिणाम मुलांवर होतो. छोट्या छोट्या चुकांसाठी कठोर शिक्षा दिल्यास मुले हिंसक बनतात. बहुतांश अल्पवयीन गुन्हेगार हे गरीब घरातून आलेले असतात. हरियाणा पोलिसांच्या अभ्यासानुसार अमली पदार्थांचे सेवन करणारी अल्पवयीन मुले अधिक गुन्हे करतात.
धर्मशिक्षण, लैंगिक शिक्षण आणि कठोर कायदे हवेत !
वॉशिंग्टन (अमेरिका) येथे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या ‘इंटेलिंक’ नावाच्या एका ॲपवर लैंगिकतेविषयी संभाषण केल्यावरून तब्बल १०० हून अधिक गुप्तचर अधिकार्यांना बडतर्फ केल्याची माहिती स्वत: राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांनी दिली. या प्रकरणी गॅबर्ड म्हणाल्या की, व्यावसायिक वापरासाठी असलेल्या या ॲपचा वापर करून असे वर्तन करणे निर्लज्जपणाचे आहे. संबंधित अधिकार्यांना केवळ कामावरूनच काढून टाकले जाणार नाही, तर त्यांचे सुरक्षा परवानेही रहित केले जाणार आहेत. अशी शिक्षा भारतातील दोषी अधिकार्यांना दिली जाते का ? समाजाची ढासळत चाललेली नैतिकता आणि साधनाविहीन समाजाचा कितीही भौतिक विकास केला, तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, हेच यातून लक्षात घेतले पाहिजे ! शिकण्याच्या वयात मुले बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करतात, हे संतापजनक आहे. हे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे द्योतक आहे. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयात बालसंस्कार वर्ग, धर्मशिक्षण अन् लैंगिक शिक्षण अनिवार्य केले पाहिजे. पोर्नाेग्राफी आणि अश्लील ऑनलाईन सामग्री यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. नशा करणार्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. मुलांना नैतिकतेचे शिक्षण दिले पाहिजे. असे केले, तरच पुढील पिढी सुसंस्कारी होऊन ती राष्ट्र आणि धर्म हितार्थ कार्य करील !
साधना केल्याने नीतीवान बनलेली पुढील पिढी राष्ट्र आणि धर्म हितार्थ कार्य करील ! |