औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे हटवा !

मथुरा येथे संतांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी !

मथुरा (उत्तरप्रदेश) – वृंदावनमध्ये २ मार्च या दिवशी धर्म रक्षा संघ आणि श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास संघटना यांनी क्रूरकर्मा मोगल बादशाह औरंगजेब याची महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील कबर बुलडोझरद्वारे हटवण्याची मागणी करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. ‘हिंदूंवर अत्याचार करणार्‍या अशा क्रूर राज्यकर्त्यांचे भारतात एकही चिन्ह दिसू नये’, असे आवाहन या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन करण्यासाठी त्यांचे प्राण अर्पण केले; परंतु औरंगजेबासमोर सनातन धर्म सोडला नाही.

१. बैठकीत संत अतुल कृष्ण दास म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहोत. औरंगजेबाची कबर खोदून घाणेरड्या नाल्यात टाकली पाहिजे. भारताच्या भूमीत औरंगजेबाची ओळख सांगणारे एकही चिन्ह असू नये. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे काम करतील, तर हिंदु सनातन धर्माला पुष्कळ अभिमान वाटेल.

२. संत सौरभ देव म्हणाले की, आपल्या भारतीय इतिहासातील सर्वांत क्रूर आणि अत्याचारी शासक औरंगजेब होता. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे. हा भारताला एक कलंक आहे. आम्ही सर्व संत आणि ऋषी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, औरंगजेबासह सर्व जुलमी शासकांचे गौरव करणे बंद झाले पाहिजे. त्यांची स्मारके आणि कबरी बुलडोझरने पाडली पाहिजेत.

३. आचार्य बद्रीश प्रसाद म्हणाले की, आपल्या सर्व संतांच्या हृदयात एक वेदना आहे. सनातन धर्मावर अत्याचार करणार्‍या अशा कलंकित लोकांची नावे आणि खुणा पुसून टाकल्या पाहिजेत. शहरातील रस्त्यांना अशा लोकांची नावे देण्यात आली आहेत. असे करणार्‍यांवर त्वरित कारवाई व्हावी. देशभरात जिथे अशा कलंकित लोकांची चिन्हे आहेत, तिथे त्या सर्वांना बुलडोझरने उखडून टाकले पाहिजे.

संपादकीय भूमिका

सगळीकडूनच अशी मागणी होऊ लागणे, हे हिंदू ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर जागे झाल्याचे दर्शक आहे ! एका चित्रपटाद्वारे किती परिणाम होत आहे, हे लक्षात घेता आता हिंदूंचा असा इतिहास सांगणारे चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे !