कथित पुरोगामित्वाच्या ओझ्याखाली दबलेले आणि ‘मराठी’ सोडून भरकटलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

नुकतेच देहली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्या निमित्ताने…

गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा खालावत आहे. यंदा देहली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडलेल्या संमेलनाचा दर्जा किती खालावू शकतो ?, याचे टोक गाठले. खरे पहाता ज्या संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रखर राष्ट्रप्रेमी आणि मराठीप्रेमी पंतप्रधान लाभलेले आहेत, त्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी स्वत:ला ‘फुरोगामी’ म्हणवत पंतप्रधानांवर टीका करण्यात, तसेच साधू-संत यांना ‘पुरोगामी’ असे ‘लेबल’ लावण्यात धन्यता मानली. संमेलनात मराठीचा जागर महत्त्वाचा असतांना उद्घाटनाच्या दिवशीच विचारपिठावर नावाच्या पाट्या इंग्रजी भाषेत लिहिलेल्या आढळल्या. नवीन साहित्यिकांना या संमेलनातून उर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल, असे या संमेलनात काहीच नव्हते. यासह नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) दर्जा’ मिळाला आहे, तर मराठी भाषेचे संवर्धन, ती घरोघरी अन् व्यवहारातही बोलली अन् लिहिली जाणे यांसाठी कोणकोणत्या स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे ? यांविषयी चर्चा होऊन ठोस कार्यक्रम हाती घ्यायला हवा होता. याच अनुषंगाने सरकारला दिशानिर्देश देणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात यंदाचे संमेलन, म्हणजे मराठीसाठी कोणताही ठोस कृतीशील कार्यक्रम न होता पुरोगामित्वाच्या ओझ्याखाली दबलेले आणि ‘मराठी’ सोडून भरकटलेले साहित्य संमेलन असेच म्हणावे लागेल !

१. आयोजनाच्या नावापासूनच संमेलनातील कथित पुरोगामित्व

साहित्य संमेलन देहलीत आयोजित करणे, त्याचे दायित्व ‘सरहद’ संस्थेकडे देणे, निमंत्रण पत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र न घेणे आणि शरद पवार स्वागताध्यक्ष असणे यामध्येच संमेलनाचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) लक्षात येतो. ‘संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा खोट्या पुरोगामित्वाचा डंका वाजवणे, हाच या संमेलनाचा हेतू होता का ?’, असाही प्रश्न निर्माण होतो. मराठी साहित्य क्षेत्रातील एक कंपू केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राजकीय भूमिका पटत नाही; म्हणून त्यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष करणे, हिंदुत्वनिष्ठ लेखकांच्या वा विचारवंतांच्या साहित्याकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करत असतो. हाच कंपू ‘देशात भूमिका स्वातंत्र्य नाही,’ असाही कांगावा करतो. यातूनच संमेलनाचे पुरोगामित्व उघड होते.

२. आयोजकांकडून जाणीवपूर्वक संमेलनावर ‘इस्लाम’ची, म्हणजेच कथित निधर्मीपणाची छाप दाखवण्याचा अट्टहास !

अ. या संमेलनाकडून आणि संमेलनात सहभागी असलेल्या साहित्यिकांकडून स्वच्छ आणि शुद्ध उच्चारांची अपेक्षा असते, तिथे सर्वधर्मसमभाव अन् कथित निधर्मीपणा दाखवण्याचा अट्टाहास आयोजकांकडून करण्यात आला आणि या अट्टाहासापोटीच ‘सरहद’ संस्थेच्या पुढाकारातून होणार्‍या या संमेलनात ‘इस्लाम’ धर्माची छाप दाखवण्यात आली अन् तीही जाणीवपूर्वक पंतप्रधानांच्या समोर !

आ. काश्मीर येथे धर्मांध मुसलमान आतंकवाद्यांनी लाखो हिंदूंना ठार मारले, हे सत्य असतांना त्याविषयी काही न सांगता ते सत्य पुसण्यासाठी ‘काश्मीर येथे मुसलमान युवकांनी बंदुका सोडून लेखण्या हाती घेतल्या’, असे जाणीवपूर्णक सांगितले गेले.

इ. ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी मराठीची थोरवी सार्‍या जगात पोचवली, त्यांनी लिहिलेले ‘पसायदान’ हे ‘शमीमा अख्तर’ यांनी म्हणतांना नमाजपठण करतांना ज्या प्रकारे हात वर केले जातात, त्याप्रमाणे जाणीवपूर्वक कृती करत म्हटले. त्या वेळी या मुसलमान महिलेचे स्वर शुद्ध नव्हते, तसेच ‘जणू काही अजान म्हणत आहेत’, अशा सुरात त्या ते म्हणत होत्या. मराठीमध्ये एकापेक्षा एक चांगले गायक, कलाकार, साहित्यिक असतांना जाणीवपूर्वक ‘पसायदान मुसलमान महिलेकडून सादर करण्याचा अट्टाहास का ?’

ई. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीसाठी स्वतंत्र कोश निर्माण केला आणि दुसरीकडे संमेलनाचे आयोजक सर्वधर्मसमभावाचे गोडवे गात आहेत, हे किती दुर्दैवी अन् धक्कादायक आहे.

उ. त्याही पुढे जाऊन पुन्हा एकदा मुसलमान महिलेनेच जैन धर्मियांचा ‘नमोकार’ मंत्र म्हणणे आणि महाराष्ट्र गीतही जाणीवपूर्वक म्हणणे यात आयोजकांना कुणाचे लांगूलचालन करायचे होते ? हे सगळे करतांना जाणीवपूर्वक या सर्व महिलांचे पोषाखही त्यांची ‘इस्लामी’ ओळख ठळकपणे दर्शवणारे होते !

वर्षानुगणिक संमेलनाची पातळी कशी खालावली जात आहे आणि मराठी संस्कृती जपण्याचे आयोजकांना काही एक भान राहिलेले नाही, हेच त्यावरून स्पष्ट होते.

३. पंतप्रधानांवर टीका करण्याइतक्या डॉ. तारा भवाळकर मोठ्या झाल्या का ?

श्री. अजय केळकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘‘माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा’, हा विषय वेगळा आहे; परंतु त्याचा भांडाफोड, या आमच्या संत कवियित्रींनी १३ व्या आणि १४ व्या शतकात केला आहे. ज्या वेळेला लिपी आणि लिहिण्या-वाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हते.’’ खरे पहाता डॉ. तारा भवाळकर यांचे वक्तव्य, म्हणजे दुर्दैवाने भवाळकर यांना हिंदु धर्म किती महान आहे आणि किती प्राचीन आहे, याची माहिती नाही, असेच म्हणावे लागेल. सार्‍या भाषांची आद्यजननी संस्कृत भाषा असून लाखो वर्षांपूर्वी ऋषिपत्नी या शास्त्रार्थ चर्चा करत. त्यामुळे १३ व्या, १४ व्या शतकात लिपी नव्हती, असे म्हणणे हे हास्यास्पद आहे.

खरेतर हा देशाच्या पंतप्रधानांना अवमान आहे. ‘महाराष्ट्रातील जे जाणते साहित्यिक आहेत, मराठीप्रेमी आहेत, हिंदुत्वनिष्ठ आहेत त्यांना हा अवमान मान्य आहे का ?’, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

४. संमेलनाध्यक्षांकडून शरद पवार यांचा जाणीवपूर्वक उल्लेख, तर मोदी आणि फडणवीस यांचा नामोल्लेख टाळणे !

एकीकडे राजकारण्यांवर टीका करतांना संमेलानाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात विचारपिठावरील सर्वांचा उल्लेख केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा तर जाणीवपूर्वक नाव घेऊन उल्लेख केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. यावरून संमेलनाध्यक्षांना हिंदुत्वाचे किती वावडे आहे, हेच स्पष्ट होते.

५. देहलीतील मराठी संस्थांना डावलणे

साहित्य संमेलनातील सर्वांत दुर्दैव, म्हणजे देहलीत दीर्घकाळापासून कार्यरत असणार्‍या मराठी संस्थांना डावलणे. देहलीमध्ये थोड्या थोडक्या नव्हे, तर तब्बल ४० मराठी संस्था आहेत. यातील काही संस्था तर १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व संस्थांना देहलीमध्ये मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि परंपरा जपून ठेवण्याचा दैदीप्यमान वारसा लाभला आहे. त्यामुळेच पूर्वी केवळ देहली आणि आता देहलीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये मराठीचा डंका ठळकपणे दिसतो.

देहलीतील ‘सार्वजनिक उत्सव समिती’, ही महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून मराठी भाषेसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या नीना हेजीब यांनी सांगितले, ‘‘देहलीत होणार्‍या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला साधे निमंत्रण देण्याचेही सौजन्य दाखवण्यात आले नाही. देहलीतील मराठी संस्थांना संमेलनामध्ये सहभागी न करून घेण्यात आयोजकांनी नेमकी धन्यता का मानली ?, याचे उत्तर मिळत नाही. देहलीतील या संस्थांमध्ये कार्यरत किमान ज्येष्ठ मंडळींना तरी कार्यक्रमात बोलावण्याचे सौजन्य दाखवण्याची आवश्यकता होती. एकूणच संपूर्ण मनमानी पद्धतीने साहित्य संमेलन आटोपण्यात आले आहे.’’

यावरूनच असे म्हणावेसे वाटते की, मराठी भाषा टिकवणे, तिचे संवर्धन करणे आणि तिची संस्कृती टिकवण्याच्या उद्देशाने साहित्य संमेलन पार पडायला हवे होते; पण तसे ते पार पडलेच नाही. हे संमेलन म्हणजे कथित पुरोगमित्वाचा डंका पिटणारे अन् दिखावा करणारे झाले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर (२७.२.२०२५)