Trump-Zelensky Oval Clash : युक्रेनकडून रशियासमवेतचे युद्ध थांबवण्यास नकार

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यात बाचाबाची !

  • झेलेंस्की शांततेसाठी सिद्ध होतील, तेव्हाच त्यांनी अमेरिकेत परत यावे ! – ट्रम्प यांचा सल्ला !

डावीकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी अमेरिकेत पोचलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियासमवेत चालू असलेले युद्ध थांबवण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतप्त झालेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘झेलेंस्की जेव्हा शांततेसाठी सिद्ध होतील, तेव्हाच त्यांनी परत यावे’, असे सांगत झेलेंस्की यांना व्हॉईट हाऊसमधून हाकलून लावले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या घटनेमुळे जगभरात प्रतिक्रिया उमटत असून युरोपीय देशांनी झेलेंस्की यांना पाठिंबा दर्शवत अमेरिकेचा विरोध केला आहे. या संघर्षामुळे झेलेंस्की यांचा अमेरिकी दौरा निष्फळ ठरला आहे, ज्यामुळे अमेरिका-युक्रेन संबंधांच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

डॉनल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांना अमेरिकेत आमंत्रित केले होते. त्यानुसार झेलेंस्की अमेरिकेत पोचले. झेलेंस्की आणि ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयामध्ये बैठक झाली. या वेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स हेही उपस्थित होते. या बैठकीचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत होते.

ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यातील भेटीत झालेले संभाषण

बैठकीत झेलेंस्की यांनी जे.डी.वान्स यांना उद्देशून म्हटले की, तुमच्यावर आमच्यासारखी युद्धाची स्थिती येईल, तेव्हा तुम्हाला समजेल. तुमच्या चारही बाजूला महासागर आहे. या वेळी ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला आणि म्हटले की, आम्हाला काय वाटेल, हे तुम्ही सांगू नका. आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला काय वाटेल, हे ठरवण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही नाही आहात. आम्हाला खूप चांगले वाटते आणि आम्ही भक्कम आहोत. तुम्हीच स्वत:ला वाईट स्थितीमध्ये टाकत आहात. तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही जिंकणार नाही आहात. आमच्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्याकडे (युक्रेनकडे) सध्या कोणतेच पत्ते नाहीत, तुम्ही तिसर्‍या महायुद्धावर जुगार खेळत आहात. तुम्ही कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात घालत आहात. आमच्या मूर्ख राष्ट्राध्यक्षाच्या (जो बायडेन यांच्या) माध्यमांतून आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर्स दिले आहेत. आम्ही तुम्हाला सैनिकी उपकरणे दिली आहेत. जर तुमच्याकडे आमची सैनिकी उपकरणे नसती, तर हे युद्ध २ आठवड्यात संपले असते (युक्रेन नष्ट झाले असते).

याच वेळी ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांनी सुद्धा झेलेंस्की यांना फटकारले. ते म्हणाले की, ओव्हल कार्यालयामध्ये अमेरिकी प्रसारमाध्यमांसमोर ट्रम्प यांच्याशी हुज्जत घालणे, हे अपमानास्पद आहे. तुम्ही (झेलेंस्की) एकदातरी ट्रम्प यांचे आभार मानलेत का ? त्यावर झलेंस्की यांनी बोलण्याचा प्रयत्न केला; पण मध्येच त्यांना रोखण्यात आले.

झेलेंस्की या वेळी म्हणाले की, आमच्या क्षेत्रातील एका मारेकर्‍याबरोबर (रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन) कुठलीही तडजोड करता कामा नये. रशियाच्या वेड्या लोकांनी युक्रेनच्या मुलांना निर्वासित केले. ३ वर्षांपासून चालू असलेल्या या युद्धात रशियाने युद्ध गुन्हे केले आहेत.

संभाषणाच्या वेळी झेलेंस्की यांनी पुतिन यांचा ‘खुनी’ असा उल्लेखही केला. झेलेंस्की यांच्या वर्तणुकीमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खूप संतापले.

डॉनल्ड ट्रम्प यांनी केलेली पोस्ट

माझ्या लक्षात आले आहे की, आज व्हाईट हाऊसमध्ये आमची खूप उत्तम बैठक झाली आणि माझ्या लक्षात आले आहे की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की अद्याप शांततेसाठी सिद्ध नाहीत. त्यांनी अमेरिकेचा अनादर केला आहे. जर अमेरिका सहभागी असेल, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की शांततेसाठी सिद्ध नाहीत; कारण त्यांना वाटते की, आमच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा लाभ होतो. मला लाभ नको आहे, मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल कार्यालयामध्ये अमेरिकेचा अनादर केला. जेव्हा ते शांततेसाठी सिद्ध असतील, तेव्हा त्यांनी परत यावे, अशी पोस्ट ट्रम्प यांनी या घटनेनंतर सामाजिक माध्यमांत केली.

झेलेंस्की काय म्हणाले ?

व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की म्हणाले की, जोपर्यंत आम्हाला आक्रमणांच्या विरोधात संरक्षण हमी मिळत नाही, तोपर्यंत आमचा देश रशियासमवेत शांतता चर्चेत सहभागी होणार नाही. ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी झालेला वाद दोन्ही देशांसाठी चांगली गोष्ट नाही. ट्रम्प यांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की, युक्रेन रशियाविषयीचा दृष्टीकोन एका क्षणात पालटू शकत नाही.

जागतिक नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा

ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यातील वादानंतर युरोपीय देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांनी म्हटले की, न्याय्य आणि शाश्‍वत शांततेच्या संघर्षात आम्ही युक्रेनच्या पाठीशी आहोत. अशाच भावना स्विडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनीही व्यक्त केल्या आहेत.

ट्रम्प यांनी झेलेंस्की यांना मारले कसे नाही, याचेच आश्‍चर्य ! – रशियाची प्रतिक्रिया

मॉस्को (रशिया) – ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यातील वादावर रशियाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, व्हाईट हाऊसमध्ये झेलेंस्की ट्रम्प यांच्यासमोर असत्य कथन करत होते. त्यांची खोटी वक्तव्ये ऐकून ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी झेलेंस्की यांना मारले कसे नाही, याचे आम्हाला नवल वाटत आहे.

संपादकीय भूमिका

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून ३ वर्षे झाली आहेत. यात ना रशियाचा विजय झाला, ना युक्रेनचा पराभव. अमेरिकेकडून युक्रेनला प्रचंड प्रमाणात आर्थिक आणि सैनिकी साहाय्य मिळत असल्याने तो युद्ध लढू शकला, हे जगजाहीर आहे. आता जर अमेरिकाच युद्ध थांबवण्यास सांगत असेल आणि सैनिकी साहाय्य थांबवू, असे म्हणत असेल, तर युक्रेनने शहाणपणा करणेच त्याच्या हिताचे आहे, अन्यथा त्याचे अस्तित्व नष्ट होणार, यात शंका नाही !