आजच्या थोडक्यात महत्वाच्या बातम्या (०१ मार्च २०२५)

ठाणे येथे पॉड टॅक्सी चालू होणार

ठाणे – घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ‘यासाठी महापालिका किंवा राज्य सरकार यांचा एकही रुपया खर्च होणार नाही’, असेही ते म्हणाले.


मुंबईत ५७ मजली इमारतीला आग !

मुंबई – भायखळा येथील ५७ मजली इमारतीला सकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. सुदैवाने आगीत कुणीही घायाळ झालेले नाही.


लाचखोर तलाठी अटकेत !

पारोळा (जळगाव) – येथील तलाठी महेशकुमार सोनवणे (वय ५० वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ सहस्र रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतातील जागेच्या नोंदी लावण्याच्या मोबदल्यात लाच मागण्यात आली होती.

संपादकीय भूमिका : अशा कर्तव्यचुकारांना पदच्युतच केले पाहिजे !


शैक्षणिक सहलीतील दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश !

नवी मुंबई – महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीत इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. खोपोलीतील ‘इमॅजिका थीम पार्क’ येथे सहल गेली होती. तो बाकड्यावर बसलेला असतांना अचानक चक्कर येऊन खाली पडला. प्राथमिक शवचिकित्सा अहवालानुसार विद्यार्थ्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रमाणित केले.


झाशीच्या राणीचा गड ३१ मेपर्यंत अतिक्रमणमुक्त !

जळगाव – राज्यातील गडदुर्ग मे २०२५ पर्यंत अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. या अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. पारोळ्यातील झाशीच्या राणीचा गड ३१ मेपर्यंत अतिक्रमणमुक्त होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. परिसरातील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.