मराठी भाषा गौरवदिन सोहळा
मुंबई – मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी ५१ नवीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांसह साहित्यक्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत यांनी कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांना पुस्तके आणि स्मृतीचिन्ह भेट दिले. कार्यक्रमाला संबोधित करतांना सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या बाहेर मराठीसाठी १७ बृहन्मंंडळे काम करत आहेत. त्यांची संख्या ५० करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. मराठी भाषेला राजाश्रय असायला हवा. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्राने ठाम उभे रहायला हवे.’’

विविध माध्यमांतून मराठीची जोपासना व्हायला हवी ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, कवी कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, लता मंगेशकर आणि अनेक ज्येष्ठांची मराठी ही बोलीभाषा होती. मराठी भाषेवर प्रेम करणारे जगभरात पसरले आहेत. मराठी लोक एकमेकांना भेटल्यावर हिंदी अथवा इंग्रजीत बोलतात. तरीही त्यांच्यात अस्मिता आहे. काळाच्या ओघात अनेक भाषा नष्ट झाल्या. मराठी लोकांनी मराठीमध्ये बोलून मराठी भाषेला जगवले पाहिजे. मराठी भाषा ही आपली ओळख आहे. मराठी ही ज्ञानभाषा झाली, तर अधिक समृद्ध होईल. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी भाषेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. चित्रपट, नाटके, कीर्तन, भजन, साहित्य, लोककला आदी सर्वांमधून मराठीची जोपासना व्हायला हवी.
मराठी भाषेसाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मराठी भाषेचा प्रसार वाढवायला हवा. मराठीला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यावर मराठी भाषेविषयीचे आपले दायित्व वाढले आहे. अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषेला निधी अल्प पडू देणार नाही.
यांना मिळाले पुरस्कार !
या वेळी मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत वर्ष २०२४ साठी ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब रंगराव बोराडे यांना घोषित होता; मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे हा पुरस्कार त्यांची कन्या श्रीमती प्रेरणा दळवी यांना प्रदान करण्यात आला. नामवंत प्रकाशन संस्थेसाठीचा ‘पु. भागवत पुरस्कार’ पुणे येथील ‘ज्योत्स्ना प्रकाशन’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ डॉ. रमेश सूर्यवंशी यांना, तर ‘श्री. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार’ श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला. यासह बाल वाङ्मय, प्रथम प्रकाशन, नाटक, एकांकिका, लघुकथा, ललितगद्य, कादंबरी आदी विविध साहित्यप्रकार सिद्ध करणार्या साहित्यकारांनाही पुरस्कार देण्यात आले.