Sunil Gavaskar On Ind Vs Pak Cricket : सीमेवर शांतता झाल्याखेरीज भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट सामने होऊ शकत नाहीत !

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची स्पष्टोक्ती !

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (उजवीकडे)

दुबई (संयुक्त अरब अमिरात) – भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा तेव्हाच पुन्हा चालू होऊ शकते, जेव्हा दोन्ही देशांचे सरकार सीमेवर शांतता सुनिश्‍चित करील, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. दोन्ही संघांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका वर्ष २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती.

गावस्कर पुढे म्हणाले की,

मला निश्‍चिती आहे की, या संदर्भात काही प्रयत्न चालू असतील; पण तुम्हाला मैदानाबाहेर काय चालले आहे, ते पहायचे आहे; कारण आपण शेजारच्या देशातून घुसखोरीविषयी अनेकदा ऐकतो. म्हणूनच भारत सरकार म्हणत आहे की, ‘जोपर्यंत घुसखोरीसारख्या घटना थांबत नाहीत, तोपर्यंत आपण काहीही विचार करू नये किंवा बोलू नये.’ जर सीमेवर शांतता असेल, तर मला वाटते की, दोन्ही सरकारे नक्कीच म्हणतील की, आपल्याकडे कोणतीही घटना घडलेली नाही, तर निदान बोलायला तरी चालू करूया.

संपादकीय भूमिका

किती भारतीय क्रिकेटपटूंनी गेल्या अनेक वर्षांत अशा प्रकारचे विधान उघडपणे केले आहे ? भारताकडून क्रिकेट खेळायचे, मात्र पाकच्या आतंकवादाच्या विरोधात तोंड उघडायचे नाही, असेच बहुतेक खेळाडू करत असतात आणि जनताही त्यांना याविषयी कधीही जाब विचारत नाही !