
सांगली, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली राज्य परिवहन विभागाकडे असलेल्या एस्.टी. बस वाहनांची अवस्था अत्यंत दयनीय आणि खराब आहे. त्यामुळे सर्वप्रथम नवीन एस्.टी. बस सद्यःस्थितीला १४० ते १५० देण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघा’चे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांना दिले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) त्या वेळी मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती असून सांगली विभागाला तातडीने नवीन बसगाड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
राज्य सरकारने देऊ केलेल्या सवलतींमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यांना सेवा पुरवण्यासाठी या बसगाड्या लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. महामंडळात यापूर्वी प्रति ४ वर्षांनी नवीन बसची बांधणी करून पुरवठा होत होता. त्याचे किलोमीटर १० लाख झाल्यानंतर त्या गाड्या भंगारात काढून त्याचा लिलाव केला जातो. गेल्या १० ते १५ वर्षांत कोणती नवीन चेसिस किंवा बस बांधणी झालेली नाही. ज्या गाड्या आहेत, त्या भंगारात घालण्याच्या पात्रतेच्या असलेल्या गाड्या आहेत. अशा गाड्यांमुळे चालक-वाहक आणि प्रवासी यांचा जीव धोक्यात आहे. भंगार गाड्या आणि अल्प गाड्या यांमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे, असे श्री. नितीन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.