‘८.३.२०२४ या दिवशी माझ्या आईचे (श्रीमती उषा ताम्हनकर, वय ८२ वर्षे यांचे) निधन झाले. २५.२.२०२५ या दिवशी माझ्या आईचे वर्ष श्राद्ध आहे. मला आईची सेवा करतांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. आई मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विकारांनी आजारी असणे
‘माझ्या आईला मागील २४ वर्षांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. ज्या प्रमाणात पथ्य करायला हवे होते, त्या प्रमाणात ती पथ्य करत नसे; पण तरीसुद्धा देवाच्या कृपेमुळे तिला इतरांच्या तुलनेत त्याचा त्रास अत्यल्प प्रमाणात झाला. शेवटपर्यंत आई स्वतःची कामे स्वतःच करत असे. त्यामुळे तिची फार सेवा आम्हाला करावी लागली नाही.

२. वडील दत्तउपासक, तर आई शिवभक्त असणे आणि तिचा मृत्यूही शिवरात्रीच्या दिवशीच होणे
माझे आई-वडील मनाने अतिशय शुद्ध होते. त्यांच्या मनात कधीच कुणाविषयी वाईट विचार नसायचा, तसेच ते कधी इतरांशी तुलना करत नसत. आम्ही ३ बहिणी आणि १ भाऊ असे चौघे जण आहोत. आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थिती असतांनाही आम्हा चारही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. माझे बाबा दत्ताची उपासना करायचे. ते प्रत्येक गुरुवारी आमच्या सदनिकेच्या जवळ असलेल्या दत्ताच्या मंदिरात न चुकता पालखीला जायचे. त्यांना श्री क्षेत्र नृसिंहवाडीलाही जायला पुष्कळ आवडायचे. ते बर्याच वेळा वाडीला मंदिरात जात असत. माझी आई ‘शिवलीलामृत’मधील ११ व्या अध्यायाचे नियमित पठण करत असे, तसेच ती रामाचा नामजपही बरीच वर्षे वहीत लिहीत असे. तिचा मृत्यूही शिवरात्रीच्या दिवशीच झाला. ही भगवान शिवाने आईवर केलेली मोठी कृपाच होती.
३. पाय घसरून जोरात पडूनही देवाच्या कृपेमुळे आईला फारसे न लागणे आणि ती २०० कि.मी. चा प्रवास करू शकणे
आम्ही दापोली येथे भाचीच्या विवाहासाठी गेलो होतो. तेथे आई पाय घसरून जोरात पडली; पण देवाच्या कृपेमुळे तिला फारसे लागले नाही. तिला थोडाफार त्रास होत होता. त्यानंतर २ दिवसांनी आम्ही तिला घेऊन पुण्याला आलो. तेव्हा ती २०० कि.मी. अंतराचा प्रवास करू शकली आणि तिला कोणताही त्रास जाणवला नाही.
४. आईने आधार घेऊन स्वत: उठण्याचा प्रयत्न करणे
दापोलीहून आल्यावर ४ दिवसांनी आईचे पाय दुखणे चालू झाले. त्यामुळे तिला चालणे-फिरणेही थोडे अवघड जाऊ लागले. तेव्हा तिच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही पुष्कळ वाढले; पण तरीही ती थोडा आधार घेऊन स्वत: उठण्याचा प्रयत्न करत असे.
५. प्रत्येक वेळी आई बेशुद्ध पडल्यावर देवाच्या कृपेने ते लक्षात येणे आणि त्यामुळे तिच्यावर त्वरित उपचार करता येऊन ती शुद्धीवर येणे
आईच्या रक्तातील साखर पुष्कळ प्रमाणात न्यून व्हायची. त्यामुळे ती अधून-मधून बेशुद्ध व्हायची. ज्या वेळी तिच्या रक्तातील साखर न्यून व्हायची आणि ती बेशुद्ध पडायची, त्या वेळी गुरुकृपेने देवच आमच्या ते लक्षात आणून द्यायचा. त्यानंतर आम्ही त्वरित तिच्यावर उपचार करायचो. उपचार केल्यावर ती शुद्धीवर यायची आणि त्यामुळे पुढील धोका, म्हणजे तिचे कोमात जाणे टळत असे. (फार काळ बेशुद्ध अवस्थेत राहिले असता मनुष्याच्या मेंदूला इजा होऊन तो गंभीर बेशुद्धावस्थेत, म्हणजे कोमात जाण्याची शक्यता असते.) ‘देव तिची किती काळजी घेत आहे !’, याची जाणीव होऊन परमेश्वराच्या प्रती आमच्या मनात कृतज्ञता व्यक्त व्हायची.
६. आईची सेवा करतांना तिच्या विषयी जाणवलेली सूत्रे
अ. आईची सेवा करतांना ‘परमेश्वरानेच आपल्याला ही संधी दिली आहे’, असा भाव आम्हाला सर्वांना ठेवता आला.
आ. आईची त्वचा हाताला मऊ लागत होती.
इ. आईची वेणी घालतांना तिचे केस एकदम मुलायम वाटत होते.
ई. तिची सेवा करतांना ‘आम्ही एखाद्या लहान मुलाची सेवा करत आहोत’, असे आम्हाला जाणवत होते.
७. ‘आईला अधिक यातना होऊ नयेत’, यासाठी प्रार्थना होणे आणि प्रत्यक्षातही मृत्यूनंतर तिच्या चेहर्यावर यातना न दिसणे
आई शेवटपर्यंत हालचाल करत होती. मृत्यूच्या दिवशीसुद्धा ती दुसर्या खोलीत असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीकडे स्वतः जाऊन बसली. त्यानंतर ती स्वतःच स्वतःच्या खोलीत विश्रांतीला गेली. तिने चहाही घेतला. मी देवाला सतत प्रार्थना करायचे, ‘तिला अधिक यातना होऊ देऊ नकोस.’ मृत्यूनंतर तिच्या चेहर्यावर कोणत्याही यातना दिसत नव्हत्या. तिचा चेहरा पुष्कळ शांत आणि समाधानी दिसत होता.
या सर्व अनुभूती दिल्याबद्दल आणि आम्हाला असे आई-वडील दिल्याबद्दल परमेश्वर अन् प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. हेमलता सखदेव (कै. (श्रीमती) उषा ताम्हनकर यांची धाकटी मुलगी, वय ५३ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |