उद्या २६ फेब्रुवारी या दिवशी ‘महाशिवरात्र’ आहे. त्या निमित्ताने…
‘भारतभरात प्रसिद्ध असलेल्या द्वादश, म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीविषयी या लेखातून जाणून घेऊया.
१. सोमनाथ
यालाच ‘सोरटी सोमनाथ’ असेही म्हणतात. हे सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात प्रभासपट्टण येथे आहे. दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिल्यावर तो दिवसेंदिवस क्षीण होऊ लागला. ब्रह्मदेवांना हे समजल्यावर ते चंद्राला म्हणाले, ‘‘तू प्रभास क्षेत्री जाऊन शंकराची आराधना कर.’’ मग चंद्राने प्रभास क्षेत्री जाऊन शिवलिंगाची स्थापना करून ६ महिने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला क्षयरोगातून मुक्त केले. स्वतः भगवान शंकर प्रभास क्षेत्राचे माहात्म्य आणि चंद्राला कीर्ती देण्यासाठी चंद्राच्या नावानेच तेथे प्रतिष्ठित झाले. ‘या ज्योतिर्लिंगाची पूजा केली असता क्षयरोग आणि कुष्ठरोग नाहीसा होतो’, मनोकामना पूर्ण होतात आणि पापमुक्ती होऊन स्वर्गप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
२. मल्लिकार्जुन
मल्लिकार्जुन हे दुसरे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात श्रीशैल पर्वतावर आहे. एकदा शिवपार्वतीचा पुत्र कार्तिकेय रुसून श्रीशैल्य पर्वतावर गेला. शंकराने कार्तिकेयाला परत आणण्यासाठी देव आणि ऋषीगण यांना आज्ञा केली. त्या सर्वांनी श्रीशैल्य पर्वतावर जाऊन कार्तिकेयाला परत आणण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पार्वती आणि शंकर श्रीशैल्य पर्वतावर जाण्यास निघाले. हे समजताच कार्तिकेय तेथून पुष्कळ दूर गेला. कार्तिकेय दूर क्रौंच पर्वतावर गेल्याचे समजताच ते ज्योतीस्वरूप धारण करून तेथेच वास्तव्य करून राहिले. तेव्हापासून भगवान शंकर ‘मल्लिकार्जुन’ या नावाने त्रैलोक्यात विख्यात झाले. जो मनुष्य या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
३. महाकाल
महाकाल हे तिसरे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन येथे आहे. याला ‘महाकालेश्वर’ असेही म्हणतात. रत्नमाला पर्वतावर दूषण नावाचा एक महाभयंकर ब्राह्मणद्रोही दैत्य होता. त्याने उज्जैन नगरीतील ब्राह्मणांना नष्ट करण्याची आज्ञा राक्षसांना केली. ब्राह्मण तशाही संकटप्रसंगी तेथे एका पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून पूजापाठात तल्लीन झाले. अत्यंत खवळलेल्या दैत्याने त्या ब्राह्मणांना ठार मारण्यासाठी शस्त्र उगारले, त्याच क्षणी त्या शिवलिंगाच्या ठिकाणी एक खड्डा निर्माण झाला आणि त्यातून भगवान शिव भयंकर रूप धारण करून प्रगट झाले. महाकालरूपी शंकरांनी दूषण दैत्यासह सर्व दैत्यांना जाळून भस्म केले. त्या ब्राह्मणांनी भगवान सदाशिवाची उत्तमोत्तम शब्दांत स्तुती करून तेथेच प्रतिष्ठित होण्याची प्रार्थना करून मोक्षाची याचना केली. भगवान शिवांनी त्या ब्राह्मणांना मुक्ती देऊन ते तेथेच विराजमान झाले.
४. ओंकार अमलेश्वर (ओंकारेश्वर)
ओंकार अमलेश्वर हे चौथे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशातील नेमाड जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी आहे. येथे नर्मदा नदीला ओंकाराचा आकार आहे; म्हणून याला ‘ओंकारेश्वर’ असे म्हणतात. विंध्य पर्वताने ओंकार येथे कठोर तपश्चर्या चालू केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी विंध्याला उत्तमोत्तम वर दिले. याच वेळी सर्व देवता, ऋषी तेथे आले. त्यांनी शंकरांना प्रार्थना केली, ‘भगवान महादेवा, जग कल्याणासाठी तुम्ही येथेच कायमचे वास्तव्य करा.’ त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेले शंकर ‘तथास्तु’ म्हणून गुप्त झाले. मग तेथे २ शिवलिंगे प्रगट झाली. एका लिंगात शंकर ‘ओंकार’ नावाने आणि दुसर्या लिंगात ‘अमरेश्वर’ किंवा ‘अमलेश्वर’ या नावाने प्रवेश केला. ही दोन्ही शिवलिंगे भक्तांना भुक्ति (अन्न) आणि मुक्ती देतात.
५. वैद्यनाथ
वैद्यनाथ हे पाचवे ज्योतिर्लिंग मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात परळी नावाच्या गावी आहे. रावणाने त्याला प्रचंड शक्ती प्राप्त व्हावी; म्हणून हिमालयात जाऊन भगवान शंकराची खडतर तपाचरणाने आराधना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी रावणाच्या हातात एक शिवलिंग देऊन त्याला सांगितले, ‘रावणा, जर तू वाटेत हे लिंग भूमीवर ठेवलेस, तर ते तेथेच कायम राहील.’ वाटेत रावणाने ते शिवलिंग एका वाटसरूकडे दिल्यावर त्याने ते भूमीवर ठेवले, तेच शिवलिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नावाने जगात प्रसिद्ध झाले. ही बातमी समजताच ब्रह्मादी सर्व देव तेथे आले. त्यांना भगवान शंकराचे प्रत्यक्ष दर्शन घडले. सगळ्यांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि प्रार्थना केली. हे ज्योतिर्लिंग मोक्षदायक आहे.
६. भीमाशंकर
भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पेटा आणि खेड तालुका यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या एका शिखरावर आहे. भीम नावाच्या राक्षसाने सामर्थ्याने इंद्रादी देवांनाही जिंकले. कामरूप देशात सुदक्षिण नावाचा एक शिवभक्त राजा होता. भीम राक्षसाला हे समजताच तो सुदक्षिण राजाकडे गेला. त्या वेळी तो राजा शिवशंकराची अगदी मनोभावे पूजा करत होता. भीम राक्षसाने राजावर तलवारीचा वार केला; पण त्याचा नेम चुकला. तलवारीचा प्रहार शिवलिंगावर पडला. त्याच क्षणी भगवान शंकर त्या शिवलिंगातून प्रगट झाले. त्यांनी भीम राक्षसाला ठार मारले. संपूर्ण राक्षस सेना जाळून भस्म केली. शंकरांने भीमरूप धारण करून भीम राक्षसाला ठार मारले; म्हणून शंकरांना ‘भीमाशंकर’ हे नाव मिळाले.
७. रामेश्वर
हे ज्योतिर्लिंग तमिळनाडू राज्यातील रामनाथपूरम् जिल्ह्यात समुद्रकाठी आहे. भगवान श्रीरामाने स्वतःच्या हस्ते या शिवलिंगाची स्थापना केली होती; म्हणून याला ‘रामेश्वर’ असे म्हणतात. लंकाविजय करून रावणादी राक्षसांना ठार मारल्यावर ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी ऋषींनी श्रीरामाला ‘शिवलिंगाची स्थापना कर, म्हणजे त्याच क्षणी सगळे पाप नष्ट होईल’, असे सांगताच श्रीरामाने हनुमंताला कैलासाहून शिवलिंग आणण्याची आज्ञा केली. हनुमानाला शिवलिंग घेऊन परत येण्यास वेळ झाल्याने ऋषींच्या सूचनेनुसार श्रीरामाने सीतेने सिद्ध केलेल्या वालुकालिंगाची विधीपूर्वक स्थापना केली. भक्तवत्सल श्रीरामाने हनुमंताने आणलेल्या शिवलिंगाची ‘हनुमदीश्वर’ या नावाने स्थापना केली.
८. औंढा नागनाथ
नागेश म्हणजेच, नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील औंढा गावाजवळ आहे. दारुका नावाच्या राक्षसीने पार्वतीला प्रसन्न करून घेतल्यावर पार्वतीने दारुकाला ‘दारुकावन’ दिले. त्या वनात दारुका आणि तिचा पती दारूक उन्मत्त झाले होते. त्यांनी अनेक ब्राह्मणांना ठार मारले. एका शिवभक्त ब्राह्मणाने शंकराची पूजा चालू केली. दारुकाला हे समजताच त्याने शंकराची पूजा मोडून टाकली. त्या ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. शंकर तेथे प्रगट झाले. त्यांनी दारुकाला ठार मारले. ‘आता चिंता करू नका. मी येथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमचा राहीन’, असे बोलून शंकर गुप्त झाले. तेथे एक शिवलिंग प्रगट झाले, तेच नागनाथ ज्योतिर्लिंग !
९. काशी विश्वेश्वर
विश्वेश्वर हे नववे ज्योतिर्लिंग उत्तर भारतात गंगा नदीच्या काठावर श्रीक्षेत्र काशी येथे आहे; म्हणून काशीला ‘विश्वनाथपुरी’, असे म्हणतात. हे प्राचीन मंदिर औरंगजेबाने नष्ट करून तेथे मशीद बांधली. विश्वेश्वराची प्राचीन मूर्ती ज्ञानवापीत पडली, असे सांगतात. विश्वनाथाचे नवीन मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. एकदा पार्वतीने शंकरांना विश्वेश्वराचे माहात्म्य विचारले. तेव्हा शंकर म्हणाले, ‘‘हे अविमुक्त क्षेत्र काशी माझे गुप्त क्षेत्र आहे. येथे सर्व प्राण्यांना मुक्ती मिळते. येथे ज्याला मृत्यू येतो, तो मुक्त होतो. येथे येऊन जो गंगास्नान करतो, त्याची संचितादी सर्व कर्मे क्षय पावतात.’’ विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली असता, सर्व कामना सिद्धीला जातात आणि शेवटी मोक्षप्राप्ती होते.
१०. त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर हे दहावे ज्योतिर्लिंग नाशिकपासून ३६ कि.मी.वर त्र्यंबक गावी आहे. जवळच गौतमी, म्हणजे गोदावरी नदी आहे. मंदिरात ब्रह्मा-विष्णु-महेश अशी तीन लिंगे आहेत; म्हणून याला ‘त्र्यंबकेश्वर’ असे म्हणतात. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे गौतमाने तपश्चर्या केली, तेव्हा भगवान शंकर प्रगट झाले आणि शंकर गंगेला म्हणाले, ‘‘गंगे, तू गौतमाला पावन कर आणि लोककल्याणासाठी वैवस्वत मनूच्या २८ व्या कलियुगापर्यंत पृथ्वीवर रहा.’’ गंगेने शंकराची आज्ञा मान्य केली. सर्व ऋषिमुनींनी गौतमांचा जयजयकार केला. मग देवांनी विनंती केली असता शंकर गौतमीच्या तटावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग रूपात कायमचे राहिले. हे ज्योतिर्लिंग महापातकांचा नाश करणारे आणि मुक्तीदायक आहे.
११. श्री केदारेश्वर
केदारेश्वर (केदारनाथ) हे अकरावे ज्योतिर्लिंग हिमालयात केदार नावाच्या शिखरावर आहे. या शिखराच्या पूर्वेला अलकनंदाच्या काठावर बद्रीनारायण असून पश्चिमेला मंदाकिनीच्या काठावर केदारनाथ आहे. कार्तिक ते चैत्र ६ महिने हे ज्योतिर्लिंग बर्फाच्छादित असते. भगवान विष्णूचे अवतार नर-नारायण बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते. काही काळानंतर भगवान सदाशिव प्रसन्न होऊन प्रगट झाले. नरनारायण म्हणाले, ‘‘परमेश्वरा, जर आमच्यावर प्रसन्न असशील, तर तू आपल्या स्वरूपाने येथेच प्रतिष्ठित हो. भक्तांच्या पूजेचा स्वीकार कर आणि आपल्या भक्तांची दुःखे नाहीशी कर.’’ नरनारायणांनी अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर केदार येथे कायमचे राहिले. त्यानंतर नरनारायणांनी त्यांची पूजा केली. तेव्हापासून भगवान शंकर ‘केदारेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले.
१२. घृष्णेश्वर
हे बारावे ज्योतिर्लिंग मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ या गावी आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी देवगिरी पर्वताजवळ सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण रहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा ! त्यांना पुत्र नव्हता. त्यामुळे दोघेही नेहमी मोठ्या काळजीत असत. ज्योतिषाच्या सांगण्यानुसार सुधर्म्याने सुदेहाची धाकटी बहीण घृष्णा हिच्याशी विवाह केला. पुढे घृष्णेला पुत्रप्राप्ती झाली. सुदेहा मनातल्या मनात आपल्या सवतीचा, म्हणजे घृष्णेचा द्वेष करू लागली. एके दिवशी रात्री सुदेहेने घृष्णेच्या पुत्राला ठार मारले आणि घृष्णा ज्या तळ्यात पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करत असे, त्या तळ्यात शव टाकले. सकाळी घृष्णा नेहमीप्रमाणे पार्थिव शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगाचे विसर्जन करण्यासाठी त्या तळ्यावर गेली. त्या वेळी भगवान सदाशिवाच्या कृपेने शिवलिंगाचे विसर्जन होताच तिचा पुत्र जिवंत होऊन त्या तळ्यातून बाहेर आला. तिची तन्मयता आणि शिवनिष्ठा पाहून भगवान तेथे प्रगट झाले. तेव्हा घृष्णा म्हणाली, ‘‘सदाशिवा, तू या ठिकाणी सदैव रहावे. त्यामुळे सर्व जगाचे कल्याण होईल.’’
– श्रीकांत गोवंडे
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक, वर्ष २०१३)