‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयी शंकानिरसन, ‘एर्गोनॉमिक्स’चे (ergonomics) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’ यांची माहिती सादर करणार आहोत. वाचक आणि जिज्ञासू यांना व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘स्त्रियांनी व्यायाम करण्याचे महत्त्व आणि स्त्री अन् पुरुष यांचे शरीर सामर्थ्य !’ यांविषयी जाणून घेऊया.
१. काही व्यक्तींच्या मनातील व्यायाम करण्याविषयीचे अपसमज आणि स्त्रियांनी व्यायाम करण्याचे लाभ
‘स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच व्यायामाची आवश्यकता आहे’, याबद्दल आता दुमत नाही. ‘व्यायामामुळे स्त्रियांचे शरीर पुरुषी घाटाचे (ठेवणीचे) होऊन त्यांच्या सौंदर्याचा नाश होतो’, असा जो आरोप होतो, त्याचा विचार करणे अगत्याचे आहे. या खोट्या समजुतीमुळे फार पुरातन काळापासून पुष्कळ स्त्रिया व्यायामाकडे दुर्लक्ष करत आहेत. ‘स्त्रियांनी व्यायाम केल्यामुळे त्यांची शारीरिक ठेवण पुरुषी तर्हेची होत नाही’, असा आपल्या देशातील अनुभव आहे.
१ अ. काहीच व्यायाम न करणार्या वरच्या वर्गातील स्त्रियांपेक्षा श्रमांची कामे करणार्या स्त्रिया अधिक बांधेसूद आणि निरोगी असतात.
१ आ. पुरुषांचे म्हणून समजले जाणारे खेळ आणि व्यायाम करूनही स्त्रियांची शरीरे पुरुषी वळणावर गेलेली नसणे : ‘स्त्रियांनी दंड-बैठका काढणे, खो-खो, टेनिस यांसारखे मैदानी खेळ खेळणे, उंच उड्या मारणे आणि नाना प्रकारच्या दौडीसारखे मर्दानी खेळ खेळणे, असे केल्यास स्नायू पुष्ट झाल्याने त्यांचे नाजूक आणि सुंदर शरीर पुरुषी वळणावर जाईल’, अशी पुष्कळ जणांना भीती वाटते. दुसर्या महायुद्धानंतर युरोप खंडांतील सर्व देशांत कुस्ती, बॉक्सिंग, रग्बी यांसारख्या मर्दानी आणि मैदानी प्रकारासह अन्य हॉकी, टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट इत्यादी अनेक प्रकारचे पूर्वी पुरुषांचे म्हणून समजले जाणारे खेळ अन् व्यायाम स्त्रिया फार मोठ्या प्रमाणावर करू लागल्या, तरीही त्यांचे शरीर पुरुषी वळणावर गेलेले दिसत नाही.
१ इ. स्त्रियांची निसर्गतः असलेली शरिराची रचना : निसर्गानेच स्त्री-शरिराची अशी रचना केली आहे की, ‘त्यांनी कितीही व्यायाम केला, तरीही त्यांचे स्नायू पुरुषांच्या स्नायूप्रमाणे पिळदार कदापि दिसत नाहीत. त्यांच्या चेहर्यास पुरुषी थाट येत नाही.’ याउलट ‘स्त्रियांनी व्यायाम केल्याने त्यांच्या शरिराला योग्य वळण मिळून त्या अधिक बांधेसूद आणि देखण्या दिसू लागतात’, असा अनुभव आहे.
१ ई. व्यायाम केल्याने पाश्चात्त्य देशांतील स्त्रियांचे आरोग्य, शरीरसामर्थ्य आणि रोगप्रतिकार शक्ती यांत सुधारणा होणे : ‘अलीकडील व्यायामाच्या प्रसारामुळे पाश्चात्त्य देशांतील स्त्रियांचे आरोग्य, शरीरसामर्थ्य आणि रोगप्रतिकार शक्ती यांत फार सुधारणा झाली आहे’, असे आढळून आले आहे. ‘निरोगी सुदृढ स्त्रियांची मुलेही साहजिकच अधिक निरोगी आणि सुदृढ होतात’, हेही शास्त्रसिद्ध आहे.
१ उ. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी स्त्रियांनी व्यायाम करण्याची आवश्यकता ! : समाजाची सर्वांगीण उन्नती करावयाची असेल, तर देशांतील पुरुषवर्ग अधिक धिप्पाड, सामर्थ्यवान, शूर, कणखर आणि सर्व बाजूंनी परिपूर्ण झाला पाहिजे. असे झाले, तरच देशाच्या उन्नतीची आशा ठेवता येईल आणि ती ठेवता यावी, यासाठी स्त्रियांसाठीही व्यायामाची आवश्यकता लक्षात घ्यावयाची असते.
२. स्त्री आणि पुरुष यांची नैसर्गिक शरीररचना
२ अ. स्त्रिया आणि पुरुष यांची निसर्गनिर्मित कार्ये स्वभावतःच भिन्न प्रकारची असल्यामुळे त्या कार्यासाठी आवश्यकतेनुसार अन् योग्य असे शरीरसामर्थ्य त्यांना लाभणे आवश्यक : स्त्री आणि पुरुष यांच्या शरीररचनेत निसर्गाने जे भेद केले आहेत, ते दूर होणे कदापि शक्य नाही. तेव्हा त्या दृष्टीने विचार करून आणि आलेला अनुभव लक्षात घेऊन स्त्री-पुरुष यांच्या व्यवहारातील शारीरिक श्रमांचे प्रकार आधीपासूनच भिन्न झाले आहेत. स्त्रियांनी कितीही आणि कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले, तरीही शरीर सामर्थ्याविषयी त्या सर्व साधारणपणे पुरुषांची बरोबरी करू शकणार नाहीत. हे खरे असले, तरीही स्त्रियांनी न्यूनता (कमीपणा) मानण्याचे कारण नाही. दोघांची निसर्गनिर्मित कार्ये स्वभावतःच भिन्न प्रकारची असल्यामुळे त्या कार्यासाठी आवश्यकतेनुसार आणि योग्य असे शरीरसामर्थ्य देण्यास निसर्ग सिद्ध असतो.
२ आ. मुलींपेक्षा मुलांची उंची, वजन आणि शक्ती अधिक असते. मुलांची संपूर्ण वाढ होण्यास २२ ते २५ वर्षे लागतात. मुलींची वाढ त्यांच्या वयाच्या २० ते २२ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होते.
२ इ. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहनशीलता अधिक असते आणि त्या पुरुषापेक्षा अधिक भावनाप्रधान असतात.
२ ई. स्त्री आणि पुरुष यांची कार्ये : पुरुषवर्गाचे सामर्थ्य अधिक असल्याने पुरुषांनी अधिक शक्तीची आणि विशेष कष्टाची कामे करणे स्वाभाविक असते. युद्धजन्य परिस्थितीस अनुकूल अशा गोष्टी पुरुषांच्या ठिकाणी अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने लढाईसारखे दुर्धर (अवघड) कार्य केवळ पुरुषांच्या वाट्यास दिले जाणे योग्य आहे. या नियमास अपवाद म्हणून काही स्त्रिया असू शकतील एवढेच. दुसर्या बाजूने म्हणजे महिलावर्गाच्या ठिकाणी गर्भधारणा, अपत्य शिक्षण, अपत्य संगोपन, गृहव्यवस्था यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दगदगीची आणि सहिष्णुतेची अनुकूलता असल्याने त्यांना त्या संबंधीची कामे करावी लागणे, हेही स्वाभाविक आहे.’
– श्री. आणि सौ. लक्ष्मीबाई मुजुमदार, बडोदे, गुजरात.
(साभार : मासिक ‘व्यायाम’)