Germany Elections : जर्मनीतील निवडणुकीत चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचा पराभव !

सीडीयू पक्षाला आघाडी, तर कट्टर राष्ट्रवादी ‘ए.एफ्.डी.’ पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष !

बर्लिन (जर्मनी) – युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था जर्मनी ! येथील चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचा आता झालेल्या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला आहे. निकालांमध्ये त्यांचा ‘सोशल डेमोक्रॅट्स पार्टी’ (एस्.डी.पी.) हा डावा पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. रूढीवादी विरोधी पक्षनेते फ्रेडरिक मर्झ यांच्या ‘ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन’ (सीडीयू) पक्षाच्या युतीने ६३० पैकी २०८ जागा (२८.५ टक्के मते) जिंकल्या, तर एस्.डी.पी.ला १२१ जागांवर (१६.५ टक्के मतांवर) समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे कट्टर राष्ट्रवादी आणि मुसलमानविरोधी पक्ष ‘ए.एफ्.डी.’ (ऑल्टरनेटिव्ह फॉर डॉयिचलँड) १५१ जागा (२०.८ टक्के मते) जिंकून दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला. दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच जर्मनीत एका कट्टर राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षाने इतक्या जागा जिंकल्या आहेत.

१. जर्मन संसदेत बहुमतासाठी किमान ३१५ जागा आवश्यक आहेत. त्यामुळे युती केल्याविना सत्ता स्थापन करणे शक्य नाही. ‘ए.एफ्.डी.’ सीडीयूसमवेत युती स्थापन करण्यास सिद्ध आहे, परंतु सीडीयूने कट्टरतावादी ‘ए.एफ्.डी.’समवेत कोणत्याही प्रकारची युती करण्यास सिद्ध नाही.

२. निवडणुकीत मध्य-उजव्या पक्ष ‘सीडीयू’च्या विजयाविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प म्हणाले की, हा जर्मनी आणि अमेरिका दोघांसाठीही एक उत्तम दिवस आहे. ते म्हणाले की, अमेरिकेप्रमाणेच जर्मनीतील लोकही ऊर्जा आणि स्थलांतर यांविषयी सरकारच्या हास्यास्पद धोरणांना कंटाळले आहेत.

इलॉन मस्क, तसेच रशिया यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप !

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क, तसेच रशिया यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. मस्क यांनी ‘ए.एफ्.डी.’च्या कट्टर राष्ट्रवादी नेत्या ॲलिस वेडेल यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. तसेच ‘डॉपेलगँगर’ आणि ‘स्टॉर्म-१५१६’ यांसारखे गट रशियातील सहस्रो ‘बॉट आर्मी’च्या (सहस्रावधी नियंत्रित केलेल्या संगणकांच्या) माध्यमांतून निवडणुकांवर परिणाम करत होते. ते प्रतिदिन सहस्रो व्हिडिओ बनवून ‘ए.एफ्.डी.’च्या समर्थनार्थ पोस्ट करत होते. तसेच १०० हून अधिक बनावट संकेतस्थळांवरून बनावट बातम्या पसरवल्या जात होत्या, असे म्हटले जात आहे.