समाजकंटकांकडून संतापजनक कृत्य
रत्नागिरी – ‘गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’, या संघटनेने रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेला ‘महादरवाजा’ असे लिहिलेला फलक १८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी काही समाजकंटकांनी तोडून टाकल्याचे निदर्शनास आले.
गेल्या ३ वर्षांपासून ‘गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’ ही संघटना गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी, राज्य पुरातत्त्व विभाग आणि नगरपालिका यांची संमती घेऊन रत्नदुर्ग किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे कार्य संघटनेने हाती घेतले आहे.
या अंतर्गत रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ (महादरवाजाजवळ) असलेल्या हनुमान मंदिराच्या बाजूला ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक २६ जानेवारी २०२५ या दिवशी रत्नागिरी नगरपरिषदेची अनुमती घेऊन लावण्यात आला होता. हा फलक तोडल्याची माहिती संघटनेचे रत्नागिरी विभागाचे तन्मय जाधव यांनी संघटनेचे दिपेश वारंग यांना संपर्क करून कळवले. त्यामुळे दिपेश वारंग यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.
हा प्रकार समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्देशाने केलेला असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. ‘१८ ते २५ वयोगटातील २ उंच तरुणांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलत आहे, तर दुसरीकडे काही समाजकंटक अशा प्रकारच्या अशोभनीय, संतापजनक आणि गडकिल्ल्यांच्या अस्मितेला ठेच पोचवणार्या कृती करत आहेत’, असे या तक्रारीत म्हटले आहे.