चाकण (पुणे) येथील संग्रामदुर्ग गडात सापडल्या शेकडो वर्षे जुन्या प्राचीन मूर्ती !

पुणे – चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट गडाच्या तटबंदीचे काम चालू आहे. जुन्या तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि भग्नावस्थेतील शेकडो वर्षे जुन्या काही पुरातन मूर्ती मिळून आल्या आहेत. त्या मूर्तींचे परीक्षण पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे. युद्धांमध्ये वीरमरण आलेल्या वीरांचे स्मारक म्हणून वीरगळ उभारली किंवा दगडामध्ये कोरली जात होती. इतिहासाची साक्ष देणार्‍या प्राचीन वस्तू, मूर्ती, गड, प्रत्येकासाठी प्रेरणादायी आणि साहसी वृत्ती जागवणारे आहेत. त्यांचे जतन आपण सर्वांनी केले पाहिजे. चाकणजवळील आगरवाडी येथे वर्ष २०१३ मध्ये इतिहासकालीन ८ किलो २३ ग्रॅम वजनाची चांदीची नाणी सापडली होती. त्यावर कालखंडाचा उल्लेख वर्ष २५५-२७७ या काळातील होती. या नाण्यांवर क्षत्रप राजा यशोदामन आणि रुद्रसेन (दुसरा) यांची मुद्रा असल्याचे स्पष्ट झाले होते. अतीप्राचीन यज्ञवराहाची मूर्ती आणि एका मूर्तीचे भग्न शिल्पही सापडले होते. दीड फूट उंच आणि दोन फूट लांबीच्या या वराहाच्या मूर्तीच्या चारही मांड्यांवर प्रत्येकी एक देवता कोरलेली आढळून आली होती.