पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (‘पी.एम्.पी.एम्.एल्.’) प्रवाशांच्या सोयीसाठी २६ जानेवारी २०२५ या दिवशी ‘आपली पी.एम्.पी.एम्.एल्.’ हे ॲप सिद्ध केले होते. या ॲपद्वारे प्रवाशांना बस कोठे आहे ? बसचा मार्ग यांविषयी माहिती दिली जात होती. या ॲपसारखेच बनावट ॲप अज्ञातांनी सिद्ध करून आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सामाजिक माध्यमांद्वारे (व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम) ॲप एकदा डाउनलोड केल्यावर परत पैसे द्यावे लागणार नाहीत, असे प्रलोभन दाखवून ॲपचा प्रसार केला जात आहे. पुणे सायबर पोलिसांनी याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या ॲपच्या द्वारे किती लोकांची फसवणूक झाली आहे ? याची माहिती घेण्यात येत आहे. प्रवाशांनी खोट्या जाहिरातींच्या प्रलोभनाला बळी पडू नये. अधिकृत संकेतस्थळावरून ॲपचा वापर करावा, असे आवाहन ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ प्रशासनाने केले आहे.