‘प्राचीन काळापासून मानव भूमीवर विविध प्रकारच्या वास्तूंची निर्मिती करत आला आहे. पूर्वी बांधकामात माती, लाकूड, चूना इत्यादी पारंपरिक अन् नैसर्गिक घटकांचा वापर होत असे. कालांतराने त्यांची जागा सिमेंट, लोखंड, कृत्रिम रंग इत्यादी घटकांनी घेतली. प्रत्येक घटकात त्याची मूलभूत स्पंदने विद्यमान असतात. तसेच बांधकामाच्या साहित्यातही त्यांची मूलभूत स्पंदने असतात. एखाद्या बांधकामातून प्रक्षेपित होणारी स्पंदने विविध घटकांवर अवलंबून असतात, उदा. बांधकाम-निर्मितीचा उद्देश, बांधकामाचा प्रकार, बांधकाम करतांना वापरलेले साहित्य, बांधकाम करणारे कारागीर आणि त्यांचे कौशल्य इत्यादी. बांधकाम करतांना ते टप्प्याटप्प्याने होत असते. या लेखातून आपण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम-परिसरात बांधकामाशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी बांधलेल्या ‘आर्.सी.सी. रिटेनिंग वॉल’च्या (टीप) संदर्भातील संशोधन पाहूया.
टीप – ‘आर्.सी.सी. रिटेनिंग वॉल’ (Reinforced Cement Concrete Retaining Wall) (आधारभिंत) : ही एकप्रकारची भिंत असते, जी माती, वाळू, दगड किंवा इतर साहित्याला एका ठिकाणी धरून ठेवण्यासाठी बांधली जाते. विशेषतः उतारांवर किंवा भूस्खलन रोखण्यासाठी तिचा उपयोग होतो. रस्ते, पूल, इमारतीचा पाया इत्यादी संरचनेत तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

१. बांधकामातील विविध टप्प्यांवरील छायाचित्रांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
‘आर्.सी.सी. रिटेनिंग वॉल’चे बांधकाम चालू झाल्यावर विविध टप्प्यांवर बांधकामाची छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. लोलकाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते.
१ अ. बांधकामातील विविध टप्प्यांवरील छायाचित्रांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : बांधकामातील कोणत्याच छायाचित्रात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. बांधकाम चालू केल्यापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंतच्या छायाचित्रांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
२. बांधकामाशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी बांधलेल्या ‘आर्.सी.सी. रिटेनिंग वॉल’मधून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होण्याची कारणे
२ अ. बांधकामाशी संबंधित सेवा करणार्या साधकांचा भाव : हे बांधकाम सनातनच्या आश्रमातील बांधकामाशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी सेवाभावाने केले आहे. या साधकांचा श्री गुरूंप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) आणि त्यांनी निर्मिलेल्या आश्रमाप्रती भाव आहे.

२ आ. बांधकामाची सेवा साधना म्हणून करणे : बांधकामाची सेवा करणारे साधक ‘बांधकाम करतांना स्वतःच्या प्रत्येक कृतीतून साधना होत आहे ना ?’ याकडे लक्ष देतात. बांधकामाची सेवा चालू करण्यापूर्वी प्रार्थना करणे, सेवेशी एकरूप होऊन नामजप करत सेवा करणे, सेवा झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी कृती ते नित्यनेमाने करतात. ते बांधकाम चांगल्या गुणवत्तेचे करण्यासह ते सात्त्विक व्हावे, यासाठीही प्रयत्नशील असतात. ते बांधकामात स्वतःकडून होणार्या चुकांचा अभ्यास करून ते सुधारण्यासाठी प्रतिदिन प्रयत्नरत असतात.
२ इ. बांधकामाची सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : बांधकामाशी संबंधित सेवा करणारे साधक प्रतिदिन बाहेरून कामगारांना कामाच्या ठिकाणी ने-आण करणे, त्यांना कामे नेमून देणे, त्यांच्याकडून ते योग्य प्रकारे करवून घेणे, कामावर देखरेख ठेवून कामात चुका होऊ नये यासाठी सतर्क राहून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणी असलेला परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आश्रमात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू असूनही त्या ठिकाणी गोंधळ-गडबड किंवा अस्वच्छता नसते. तेथील परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असतो.
थोडक्यात, बांधकामाची सेवा करणार्या साधकांनी केलेल्या भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेमुळे ‘रिटेनिंग वॉल’मध्ये सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होऊन त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. समाजातील लोक पुष्कळ पैसे व्यय करून मोठमोठ्या उंच अन् आकर्षक इमारती बांधतात; पण त्या सात्त्विक असतीलच असे नाही. याउलट आश्रमातील चैतन्य, बांधकामाशी संबंधित सेवा करणार्या साधकांचा सेवाभाव यांमुळे ‘रिटेनिंग वॉल’च्या बांधकामातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘बांधकामासारखी कृती (वास्तूनिर्मिती) सेवाभावाने केली, तर त्या बांधकामात (वास्तूत) पुष्कळ सात्त्विकता निर्माण होते’, हे या उदाहरणातून लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.२.२०२५)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
बांधकामासारखी कृती (वास्तूनिर्मिती) सेवाभावाने केली, तर त्या बांधकामात (वास्तूत) पुष्कळ सात्त्विकता निर्माण होते !