निवती रॉक (वेंगुर्ला) येथे पाण्याखालील संग्रहालयात होणार रुपांतरित
सिंधुदुर्ग – भारत सरकारने भारतीय नौदल सेवेतून निवृत्त झालेली आय.एन्.एस्. ‘गुलदार’ ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (MTDC) सुपुर्द केली आहे. ही नौका वेंगुर्ले तालुक्यातील ‘निवती रॉक’जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालयात रूपांतरित करण्यात येणार आहे. सध्या ही नौका देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली आहे. ही ‘युद्धनौका’ पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ यांमध्ये रूपांतरित होणारा भारतातील पहिला उपक्रम आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पाण्याखालील पर्यटनस्थळ’ म्हणून होण्याची शक्यता आहे.
भारतीय नौदलाच्या बंद केलेल्या युद्धनौकेचा अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सेवेतून निवृत्त झालेल्या नौकांना कृत्रिम खडकांमध्ये रूपांतरित करून सागरी पर्यावरण संवर्धनास साहाय्य करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. हा पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक उपाय मानला जातो, जो स्थानिक पर्यटन आणि सागरी जैवविविधतेला चालना देतो. या नौकेने ३९ वर्षे देशसेवा केली आहे. नौदलाच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये या नौकेने सहभाग घेतलेला आहे. वर्ष १९८५ मध्ये नौदलात दाखल झालेली ही नौका वर्ष २०२४ मध्ये सेवेतून निवृत्त झाली. सध्या पर्यावरणदृष्ट्या आवश्यक त्या स्वच्छता कामासाठी ही नौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली आहे.