महाकुंभनगरीतील भव्य तंबू नगरींचे रचनाकार ‘लल्लूजी अँड सन्स’ !

महाकुंभनगरीतील ७ सहस्रांहून अधिक संस्था, संप्रदाय यांचे सहस्रो तंबू उभारणे, त्याचप्रमाणे महाकुंभनगरीत लाखो लोक राहू शकतील, अशी ‘टेंट सिटी’ (तंबू नगरी) उभारणे, प्रत्येक वेळी अर्धकुंभ, पूर्णकुंभ, माघ मेळा या वेळी तंबू उभारणे यांसाठी प्रामुख्याने जे नाव घेतले जाते ते म्हणजे लल्लूजी यांच्या आस्थापनाचे ! भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.

१. कुंभनगरीतील तंबूंची मागणी वाढली !

कुंभनगरीत तंबूंची मागणी प्रत्येक वेळच्या महाकुंभमेळ्यात ४ ते ५ पटींनी वाढत असते. या वेळची मागणी ८ ते १० पटींनी वाढली होती. या वेळी महाकुंभमेळ्यात सेक्टरची संख्या वाढली होती, जागा वाढली होती आणि त्या दृष्टीने तंबूंचा पुरवठा करण्यासाठी वाढीव मागणी करावी लागते. सरकार प्रत्येक वेळच्या कुंभमेळ्यासाठी नवीन काय सुविधा देता येतील ? आणखी काय सुधारणा करता येतील ? यावर लक्ष देऊन असते. त्यानुसार आम्हाला आमचे उत्पादन वाढवावे लागते, सुविधा आणखी चांगल्या कराव्या लागतात. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वी कुंभमेळ्याला केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक यायचे, या वेळी भारतभरातील प्रत्येकाला महाकुंभात येण्याची इच्छा होती. त्यामुळे या वेळी महाकुंभासाठी लोकांची गर्दी पुष्कळ होती.

श्री. निखिल अग्रवाल

२. महाकुंभमेळ्याकडे पहाण्याची लोकांची दृष्टी पालटली !

या वेळच्या महाकुंभमेळ्याचा प्रसार पुष्कळ झाला आणि लोकांची त्याकडे पहाण्याची दृष्टीही पालटली आहे. लोक त्यांच्या मुळाशी (सनातन धर्माशी) जोडले जाण्यास अधिक इच्छुक आहेत, असे दिसले. महाकुंभमेळा आता लोकांना एकत्र येण्याचे, धर्माशी जोडले जाण्याचे माध्यम बनले आहे. हा चांगला पालट घडत आहे.

श्री. यज्ञेश सावंत

३. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कुंभमेळ्यासाठी काम करणे

आमचे आस्थापन १०० वर्षे जुने आहे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीही कुंभच्या आयोजनासाठी आम्ही काम केले आहे. त्या वेळच्या इंग्रज प्रशासकीय अधिकार्‍यांची आम्हाला चांगल्या व्यवस्थेसाठी दिलेली प्रमाणपत्रे आहेत. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कार्यकाळातही आम्ही कुंभासाठी योगदान दिले आहे. त्या वेळी त्यांनीही आमच्या चांगल्या कामासाठी आम्हाला प्रमाणपत्रे दिली आहेत. भारतात जेथे जेथे कुंभाचे आयोजन असते, आम्ही त्याचा भाग असतो. या कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या व्यतिरिक्त भारतभरात जे मोठे कार्यक्रम असतात, त्यांसाठी आम्ही काम करतो, उदा. भारताच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रदर्शने, ‘व्हायब्रंट गुजरात’ यांसारखे मोठे कार्यक्रम असतात, त्या वेळी आम्ही तंबू उभारले होते. आम्ही प्रत्येक वेळच्या आयोजनात काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. या १०० वर्षांत ज्याप्रमाणे सुविधा वाढत गेल्या, त्यानुसार आम्ही त्या महाकुंभमेळ्यात पुरवण्याचा प्रयत्न केला आहे.

तंबू

४. महाकुंभमेळ्याचे मोठे आयोजन

आम्ही भारतभरात अनेक मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असलो, तरी महाकुंभाचे आयोजन एका वेगळ्याच पातळीवर करावे लागते. एकूण २५ किलोमीटर x २५ किलोमीटर आकाराच्या, म्हणजेच ६२५ वर्ग किलोमीटर एवढ्या अवाढव्य क्षेत्रफळावर कुंभमेळा वसला होता. या ठिकाणी १० वर्ग मीटरची जागाही तुम्हाला रिकामी मिळणार नाही. येथे प्रत्येक इंच जागा मिळवण्यासाठी सहभागी संप्रदाय, संस्था प्रयत्न करत असतात. एवढे वर्ग किलोमीटरमध्ये तंबूंची व्यवस्था करावी लागते. या वेळचे आयोजन आमच्यासाठीही अभूतपूर्व असेच होते. वास्तविक कुंभमेळ्याचे कागदोपत्री नियोजन जरी एक वर्ष आधीपासून चालू असले, तरी कुंभमेळ्याच्या जागेतील व्यवस्था उभारण्यासाठी आम्हाला केवळ अडीच मासांचाच अवधी होता. या अडीच मासांतच हे शहर उभे राहिले आहे. आम्ही पूर्वीपासून या कुंभमेळ्याच्या कामाशी जोडले गेलो असल्याने त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे करू शकलो. हरिद्वार, नाशिक, उज्जैन येथील कुंभमेळ्यामध्येही आम्ही तंबू उभारतो.

५. ४ सहस्र कामगारांद्वारे तंबूंची उभारणी

आमच्या आस्थापनाद्वारे कुंभमेळ्यात ४ सहस्र लोक काम करत होते. अन्यही काही आस्थापनांचे लोक काम करत होते. आम्हाला मटेरिअल, म्हणजे कापडाची सिद्धता मोठ्या प्रमाणात करावी लागते. रात्रंदिवस कुंभमेळ्याच्या जागेवर काम करावे लागते, तेव्हा कुठे ते वेळेत पूर्ण होऊ शकते. या ठिकाणी विविध प्रकारच्या तंबूंची व्यवस्था सर्वाेत्तम अशीच करावी लागते, म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान आले, तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या आरामदायी आणि चांगल्या प्रकारच्या तंबूंची व्यवस्था, एखाद्या आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यास त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या तंबूची व्यवस्था आणि एखाद्या गावातील ग्रामस्थ आल्यास त्याच्यासाठीही वेगळ्या प्रकारचा तंबू. असे अनेक प्रकारचे तंबू आम्हाला सर्वाेत्तम गुणवत्तेचे उभारावे लागतात. आधीच पूर्वनियोजन असल्यास आम्हाला तंबूंची व्यवस्था त्याप्रकारे विचार करून करता येते. अन्यथा नंतर ही व्यवस्था वाढवायची झाल्यास तेव्हा थोडी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते; कारण पुन्हा कापड, लाकूड, कामगार, जागा यांचा नव्याने विचार करावा लागतो.

६. ६ ते ७ लाख तंबूंची उभारणी !

तंबूंचा विचार करता ते अनेक आकार आणि प्रकारांतील असतात. या वेळी सांगायचे झाल्यास किमान ६ ते ७ लाख तंबू उभारण्यात आले होते. तंबूंच्या व्यतिरिक्त ‘स्ट्रक्चर’ (सांगाडे उभारून त्याद्वारे तंबू उभारणे) अनेक प्रकारचे आहेत. ज्यामध्ये टीन शेड, जर्मन हँगर, पॅगोडा आहेत. निवासी तंबूंमध्ये कॉटेज, दरबारी, सैन्याच्या तंबूंचा आकार आणि प्रकारातील, तसेच आरामदायी अन् उच्च दर्जाच्या निवासासाठी, उदा. सर्किट हाऊसच्या उभारणीसाठी त्यामध्ये पंचतारांकित सुविधा असलेले तंबू, पंचतारांकित व्यवस्था असलेल्या हॉटेलप्रमाणे तंबू ज्यामध्ये तंबूतच प्रसाधनगृह, शौचालय यांची सुविधा आम्ही देतो. या पंचतारांकित व्यवस्था हॉटेलमध्ये जशा मिळतात, अगदी त्याचप्रमाणे अगदी आकर्षक स्वरूपात आम्ही उभारून देतो. छोलदारी, स्वीस कॉटेज, जर्मनी हँगर अशा शेकडो प्रकारचे तंबू आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार सिद्ध करून देतो. जे जे लोकांना कायमस्वरूपी बांधकामात मिळू शकते, ते ते सर्व आम्ही तंबूंमध्ये उभारून देऊ शकतो. त्यामुळे कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे तंबू सिद्ध होऊ शकतात.

७. जुन्या आणि नवीन साहित्याचा उपयोग

काही तंबू हे जुने वाटतात, काही तंबूंची कापडे नवीन असतात. यामागे असे आहे की, मोठ्या प्रमाणात ‘इन्व्हेंट्री’ (तंबूंचे कापड आणि उभारणीसाठी असलेले साहित्य) असते. जेव्हा जशी आवश्यकता असते, तेव्हा आमच्या भव्य गोदामांमधील कापड, वस्तू आम्ही घेतो, ती चांगल्या प्रकारे स्वच्छ करतो आणि त्यावर शिवणकाम करायचे असेल, अन्य काही प्रक्रिया करायची असल्यास ती करून वापरतो. असे असले, तरी सर्व जुनेच वापरतो, असे नाही. प्रत्येक वेळी नवीन कापड, साहित्य यांचा अंतर्भाव करावा लागतो. जुने आणि नवीन कापड मिळून ते चांगले कसे करून देता येईल, जेणेकरून तंबूंमध्ये रहाणार्‍याला नवीनच तंबूत रहात आहोत, असे वाटेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

एखादा तंबू किती मोठ्या आकारात लावायचा किंवा किती चांगल्या दर्जाचा लावायचा, हे एकतर सरकार ठरवते आणि आम्ही उभारल्यावर सरकार आम्हाला त्याचे पैसे देते. जर एखाद्या संस्थेला स्वत:ला तसे ठरवायचे असल्यास संस्था आम्हाला सांगते आणि आम्ही त्यांना उभारून देतो, तेव्हा संस्था थेट आम्हाला पैसे देते. शेवटी हे संबंधित संस्था, संप्रदाय यांच्यावर आहे की, त्यांची किती माणसे येणार आहेत ? त्यांना एखाद्या तंबूमध्ये किती लोक अपेक्षित आहेत ? त्यांना किती तंबू हवे आहेत ? त्यांना कशी व्यवस्था हवी आहे ? आम्ही ती व्यवस्था करून देतो

८. २० सहस्र ट्रक साहित्य लागले !

संस्था त्यांना आवश्यक तेवढी जागा, सुविधा सरकारकडे मागते. नंतर सरकार ठरवते की, कुठल्या संस्थेला किती जागा द्यायची ? काय सुविधा द्यायच्या ? त्यानंतर दिलेल्या नियोजनानुसार तंबू (छावणी) उभारावी लागते. संपूर्ण कुंभक्षेत्रासाठी आम्हाला २० सहस्र ट्रक एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य लागले. या साहित्यामध्ये तंबूचे कापड, बांबू, काठ्या, प्लाय, स्टील अशा तंबू उभारणीतील सर्व प्रकारच्या साहित्याचा समावेश होतो. आमच्या ‘इन्व्हेंट्री’चेच (संगणकीय सूचीचेच) मूल्य ३ ते ५ सहस्र कोटी रुपये एवढे असून त्यासाठी ३० जण संगणकीय नोंदी करतात. आमच्या भारतभरातील सर्व गोदामांमधून येथे साहित्य आले आहे.

९. ५ सहस्र जागी तंबू उभारण्याची कामे, कोट्यवधी मीटरचे कापड लागले !

आम्ही कुंभक्षेत्री एकूण ५ सहस्रांहून अधिक जागांवर (साईटवर) तंबू उभारण्याची कामे केली. या प्रत्येक जागी किती कापड लागले, ? किती अन्य साहित्य लागले ? या प्रत्येकाची मी तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतो. आम्हाला जसे लिखित मिळते, तसे आम्ही काम पूर्ण करत असतो. आकड्यांचा भाग सांगायचा झाल्यास या ठिकाणी आम्हाला कोट्यवधी मीटरचे कापड लागले असेल, माझ्यासाठी त्याची तशी एकूण मोजदाद आवश्यकता वाटत नाही. लोक म्हणतात, लल्लूजींकडे एवढे कापड आहे की, भारतात जम्मू-काश्मीरपासून खाली तमिळनाडूपर्यंत सलग कापडाचा एक पट्टा सिद्ध होऊ शकतो किंवा आमच्याकडे एवढ्या काठ्या, बांबू आहेत की, ते एका सरळ रेषेत लावले, तर युरोपपर्यंत रस्ता सिद्ध होऊ शकतो, हे सर्व बातम्या देणार्‍यांची कामे आहेत. एवढेच यात सांगू शकतो की, लाखो पटींमध्ये सर्व साहित्य लागते.

१०. ५०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय !

आमचा भारतातील प्रत्येक मोठ्या आयोजनात सहभाग असतो. गुजरातमध्ये रणोत्सवासाठी ५०० हून अधिक चांगल्या दर्जाच्या खोल्या सिद्ध केल्या होत्या. नवी देहलीतील प्रगती मैदान, मुंबईतील प्रदर्शने अशा मोठ्या आयोजनातील व्यवस्था आम्ही उभारतो. आमचा एकूण ५०० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय आहे. आता आमची चौथी पिढी कार्यरत आहे. संस्था किंवा सरकार यांकडून आम्हाला तंबू उभारण्याच्या जागेचा आराखडा (लेआउट) जेवढा अचूक मिळतो, तेवढे आमचे श्रम वाचतात; कारण एखाद्या संस्थेने आम्हाला जागेचा आराखडा देतांना तो व्यवस्थित दिला नाही, तर आम्हाला पुन्हा उभारलेल्या रचनेमध्ये पालट करण्यासाठी निष्कारण वेळ आणि मनुष्यबळ द्यावा लागतो. अचूक नियोजन असल्यास ते टाळता येऊ शकते. लोकांना अशा मेळ्यांच्या ठिकाणी आता कुटुंबासह रहायचे असल्यामुळे चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त तंबू देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

श्री गुरुचरणार्पणमस्तु।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१२.३.२०२५)