‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील एक वाक्य अतिशय बोलके आहे, ‘सरकार उनकी है तो क्या हुआ? सिस्टम तो हमारा है !’ यावर कुणालाही असा प्रश्न पडेल की, सर्वशक्तीमान शासनव्यवस्था हातात असतांनाही तिच्यावर मात करणार्या या ‘सिस्टम’कडे (प्रशासकीय यंत्रणेकडे) अशी कोणती शक्ती असते ? याचे उत्तर लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले, त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रात भाजपला इतका मोठा धक्का का बसला ?, हे सांगताना ते म्हणाले, ‘‘विरोधकांच्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला (खोट्या कथानकाला) उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो.’’ वास्तविक पहाता गेल्या १० वर्षांत विविध आघाड्यांवर मोदींनी केलेले प्रचंड काम, जगात वाढलेली भारताची पत हे सगळे लक्षात घेता ही निवडणूक भाजपसाठी ‘केक वॉक’ (एकतर्फी स्पर्धा) ठरेल, अशी अपेक्षा होती; पण कुठलीही विश्वासार्हता नसलेल्या विरोधकांच्या आघाडीला केवळ ‘फेक नॅरेटिव्ह’च्या आधारे बळ पुरवण्यात आले आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल धक्कादायक म्हणावे असेच लागले. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’चा (‘सीएए’चा) भारतीय मुसलमानांशी काहीही संबंध नसतांना ‘या कायद्यामुळे त्यांची नागरिकता जाईल’, हे त्यांना कसे पटवण्यात आले ? शेतकर्यांना जखडणार्या बेड्यांपासून त्यांना मुक्ती देणार्या कायद्याविरुद्ध त्यांना कसे भडकवण्यात आले ? बांगलादेशातील लोकनियुक्त सरकार बघता बघता कसे उलथवण्यात आले ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत ‘नॅरेटिव्ह’च्या युद्धामध्ये ! काय आहे हा प्रकार ? ‘नॅरेटिव्ह’ म्हणजे नेमके काय ? सरकारे उलथवून टाकण्याइतकी शक्ती या ‘नॅरेटिव्ह’मध्ये कुठून येते ? या युद्धात साम्यवादी इतके पारंगत कसे असतात ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आता प्रयत्न करूया.
१. मूळ (क्लासिकल) मार्क्सवाद आणि मार्क्सवाद्यांनी पालटलेले धोरण
‘समाजाला शोषक आणि शोषित या गटांमध्ये विभाजित करणे, त्यांच्यात सतत संघर्ष भडकवत ठेवणे, या संघर्षातून अराजक अन् अराजकातून विध्वंस निर्माण करणे’, हा साम्यवादी विचारांचा गाभा आहे. मार्क्सने सांगितलेल्या मूळ (क्लासिकल) मार्क्सवादात हा संघर्ष भांडवलदार आणि कामगार यांच्यामध्ये होईल, असे गृहीत धरले होते, म्हणजेच संघर्षाचा आधार आर्थिक होता. मार्क्सने भाकीत केले होते की, ‘जिथे सर्वाधिक औद्योगिकरण झाले होते, त्या इंग्लंड-जर्मनीसारख्या पाश्चात्त्य देशांतील कामगार देशादेशांतील सीमा झुगारून एक होतील आणि बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती करून भांडवलशाही नष्ट करतील’; पण यातील काहीच घडले नाही. पाश्चात्त्य जगतात झपाट्याने निर्माण होणार्या समृद्धीचा लाभ कामगारांनाही झाला आणि ते ‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) क्रांतीत सहभागी होतील, ही शक्यता पार मावळली. दुसर्या बाजूला रशियात वर्ष १९१८ मध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीनंतर अवघ्या ३ वर्षांत अर्थव्यवस्था इतकी रसातळाला गेली की, उपासमारीतून होणारे मृत्यू टाळण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांना निधी जमा करून ‘हूवर कमिशन’च्या माध्यमातून रशियन नागरिकांच्या अन्नधान्याची सोय करावी लागली. अमेरिका आणि पश्चिम युरोप येथे ‘मूळ (क्लासिकल) मार्क्सवाद’ रुजणे अशक्य आहे, हे ओळखून मार्क्सवाद्यांनी मग स्वतःचे धोरण पालटले.

२. ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ म्हणून समाजात नवीन संघर्षबिंदू सिद्ध करणे
कुठल्याही देशाच्या वा समाजाच्या शक्तीचे ४ स्रोत असतात- आर्थिक शक्ती, लष्करी शक्ती, ज्ञानाची शक्ती आणि भाषा. साहित्य, संगीत, फॅशन यातून येणारी ‘सॉफ्ट पॉवर’ ! या चारही विषयांमध्ये आपण पाश्चात्त्य जगताची बरोबरी कधीच करू शकत नाही, हे उमगलेल्या साम्यवाद्यांनी एक विकृत; पण प्रभावी अशी योजना सिद्ध केली, जिला ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ म्हणून ओळखले जाते.
शक्तीच्या वरील चारही स्रोतांचा एक आधार असतो. तो म्हणजे स्वयंबोध किंवा ‘सेन्स ऑफ सेल्फ’, म्हणजेच त्या देशाची/समाजाची ‘स्टोरी’ ! पाश्चात्त्य जगताची ‘स्टोरी’ होती आधुनिकता, विज्ञान, खुली अर्थव्यवस्था यांच्या साहाय्याने एका समृद्ध, संपन्न, सगळ्यांना समान संधी आणि न्याय उपलब्ध करून देणार्या लोकशाहीवादी अन् ‘लिबरल’ (उदारमतवादी) समाजाची निर्मिती ! या स्वयंबोधाचे मूळ असते, त्या समाजाच्या संस्कृतीत. पाश्चात्त्य समाजाची स्टोरी त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांच्यात तुटलेपणाची आणि निराशेची (Alienation and Hopelessness) भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी पाश्चात्त्य संस्कृतीच्या विध्वंसाची योजना आखली. समाजात संघर्ष निर्माण करण्याचा आधार आता आर्थिक नव्हे, तर सांस्कृतिक ठरला आणि ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’ या एका संघर्षबिंदूऐवजी ‘गोरे विरुद्ध काळे’, ‘स्त्री विरुद्ध पुरुष’, ‘बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य’, ‘नागरिक विरुद्ध स्थलांतरित’, असे अनेक नवे संघर्षबिंदू सिद्ध केले गेले.
३. देशाच्या प्रमुख वैचारिक प्रवाहावर आणि संस्कृतीवर थेट आक्रमण
याच वेळी ‘संपूर्ण जगावर स्वतःची सत्ता आणि वर्चस्व असले पाहिजे’, ही आसुरी महत्त्वाकांक्षा असलेली आणखी एक शक्ती अस्तित्वात होती. ती म्हणजे अतीश्रीमंत आणि महाशक्तीशाली ‘डीप स्टेट’. ‘जगातील सर्व राष्ट्रांनी आपल्या हिताची धोरणे राबवण्याचा आग्रह न धरता अमेरिकेसमोर मान तुकवावी’, हा या ‘डीप स्टेट’चा आग्रह असतो. यामध्ये न अडकणार्या राष्ट्रांमध्ये अराजक माजवून तेथील सरकारे उलथवून टाकण्यासाठी ते सांस्कृतिक मार्क्सवाद्यांना हाताशी धरतात; कारण मार्क्सवाद्यांनी श्रीमंती विरोध सोडून दिलेला असल्यामुळे त्यांच्याशी युती करणे ‘डीप स्टेट’ला अवघड वाटत नाही आणि आधुनिक युगातील युद्धात वापरल्या जाणार्या एका प्रभावी तंत्रावर साम्यवाद्यांची हुकुमत असते.
आर्थिक शक्ती, लष्करी शक्ती, ज्ञानाची शक्ती आणि ‘सॉफ्ट पॉवर’ यात आपण लोकशाही / भांडवलशाही राष्ट्रांची बरोबरी करू शकत नाही, हे लक्षात आलेल्या साम्यवाद्यांनी शक्तीचा एक नवा स्रोत शोधून काढला – ‘पॉवर ऑफ नॅरेटिव्ह’ (खोट्या कथानकाची शक्ती). इ.स.पूर्व ५ व्या शतकात चिनी तत्त्वज्ञ त्सुन त्झु याने म्हटले होते, ‘युद्धकला ही मुख्यतः शत्रूची फसवणूक करणार्या कपटनीतीवर अवलंबून असते. रणांगणावर प्रत्यक्ष लढणे, हा युद्धाचा अगदीच प्राथमिक प्रकार आहे. शत्रूच्या देशात जे काही मौल्यवान असेल त्याचा, त्यालाच स्वयंविध्वंस करायला लावून न लढताच शत्रूला संपवणे यापेक्षा श्रेष्ठ दुसरी कुठलीही कला नाही. आपले लक्ष्य असलेल्या देशातील लोकांमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण केला की, त्यांना स्वयंविध्वंसाकडे लोटणे सहज शक्य होते. देशाची ओळख ठरतील, अशी ज्यांच्यासाठी देशाचे नागरिक प्रसंगी प्राण द्यायलाही मागे-पुढे बघणार नाहीत, अशी मूल्ये, तत्त्वे, श्रद्धास्थाने…, म्हणजेच त्या देशाची संस्कृती नष्ट करणे यासाठी आवश्यक असते.’ ‘महिषासुर जयंती साजरी करा, रावणाला नायक माना, रामाला ‘पुरुषसत्तावादी (पॅट्रिआर्कल)’ ठरवून त्याच्या पूजेला नकार द्या, दिवाळी आणि होळी यांसारख्या सणांमध्ये काही ना काही खोड काढून त्यांच्याविरुद्ध प्रचार करा…’, अशा गोष्टी किती पद्धतशीरपणे रुजवल्या जात आहेत, हे आपण बघतो. हे सरळसरळ संस्कृतीवर होणारे आक्रमण आहे. यासाठी देशाच्या प्रमुख वैचारिक प्रवाहावर (‘मेनस्ट्रीम नॅरेटिव्ह’वर) नियंत्रण ठेवावे लागते.
४. ‘नॅरेटिव्ह’ची व्याख्या आणि ‘नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून हुकुमत प्रस्थापित करण्याची विशिष्ट कार्यपद्धत
‘नॅरेटिव्ह’ची व्याख्या : representation of a particular situation or process in such a way as to reflect or conform to an overarching set of aims or values. (कुठलीही परिस्थिती वा प्रक्रिया, काही व्यापक उद्दिष्टांशी वा मूल्यांशी सुसंगत अशा पद्धतीने सादर करणे), अशी करता येईल. आपल्याला हवा तो ‘नॅरेटिव्ह’ रुजवण्यासाठी, कुठल्याही वास्तवाचे आकलन, लोक आपल्याला हव्या त्या पद्धतीनेच करतील, असे वैचारिक वातावरण आणि संदर्भ निर्माण करावे लागतात. यासाठी लोकांच्या मनावर प्रभाव टाकणार्या शिक्षण, माध्यमे आणि करमणूक यांसारख्या क्षेत्रांवर नियंत्रण मिळवावे लागते. पाश्चात्त्य जगात काय किंवा भारतात काय, विद्यापिठांवर विशेषतः इतिहास, राज्यशास्त्र यांसारख्या ‘ह्युमॅनिटीज’मधील (मानवतेमधील) विषयांवर साम्यवाद्यांचे संपूर्ण नियंत्रण असते. पश्चिमेतील ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘बीबीसी’, तसेच भारतातील माध्यम क्षेत्रांत साम्यवाद्यांचेच वर्चस्व असते.
हॉलीवूड, बॉलीवूड, तसेच ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वरून साम्यवादी ‘अजेंडा’च (कार्यसूची) रेटला जातो. वर्षानुवर्षांच्या योजनाबद्ध प्रयत्नांतून त्यांनी हे साध्य केले आहे; म्हणून त्यांची ‘नॅरेटिव्ह सेटिंग’वर हुकुमत आहे. या संस्थांवर स्वतःची हुकुमत प्रस्थापित करण्याची त्यांची विशिष्ट कार्यपद्धत आहे –
अ. येनकेन प्रकारेण एक-एक संस्था कह्यात घ्या.
आ. त्या संस्थेत नवीन नेमणुका करतांना ‘मेरिट’पेक्षा (गुणवत्तेपेक्षा) ‘आयडिओलॉजी’ला (विचारसरणीला) प्राधान्य द्या.
इ. प्रत्येकाने विचारसरणीशी संपूर्ण बांधिलकी ठेवलीच पाहिजे, असा आग्रह धरा.
ई. बांधिलकी मानणार्यांना वेतनवाढ, बढती यांसारखी पारितोषिके द्या. थोडाही वेगळा विचार करणार्यांना काम करणे अशक्य करून त्यांना दूर करा, म्हणजेज ‘कॅन्सल कल्चर’ वापरा.
– श्री. अभिजीत जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.