मडकई येथे आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा, १५ मार्च (वार्ता.) – भाजप आणि मगो या २ पक्षांची युती कायम राहील आणि ही युती मोदी यांचे विचार घरोघरी पोचवण्याचे काम एकत्रितपणे करील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. आरोग्य खात्याकडून मडकई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ मार्च या दिवशी विनाशुल्क आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणार्या मोठ्या आरोग्य शिबिराच्या (मेगा मेडिकल कँपच्या) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर, गोवा दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्या डॉ. आयडा डी नोरोन्हा डी आताईद आणि आरोग्य अधिकारी डॉ. उत्कर्ष उपस्थित होते.
याप्रसंगी राणे म्हणाले, ‘‘मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यामुळे मडकई मतदारसंघाचा पुष्कळ विकास झाला आहे. ढवळीकरांना गोव्याच्या मंत्रीमंडळामध्ये जेवढा मान आहे, त्याहून अधिक मान केंद्रात आहे. ते माझे केवळ राजकीय मित्र नाहीत, तर ते मला मोठ्या भावासारखे आहेत. माझ्यात शिस्त यावी, म्हणून माझे वडील सुदिन ढवळीकर यांना मला सल्ला द्यायला सांगायचे. भाजप आणि मगो पक्ष मिळून पंतप्रधान मोदी यांच्या विचारधारेनुसार अपेक्षित असे कार्य करत असून मोदी यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम भाजप अन् मगो मिळून करणार आहेत. राज्यातील जनतेला विनामूल्य आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य खात्याकडून गोवा राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. नागरिकांनी या शिबिरांचा पूर्ण लाभ घ्यावा.’’ या आरोग्य शिबिराला मडकई येथील ग्रामस्थांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आरोग्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी फ्रेजल आरावजो यांची नियुक्ती
आरोग्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी फ्रेजल आरावजो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आरोग्य खात्याच्या आणि महिला अन् बालकल्याण खात्याच्या प्रमुख म्हणून काम पहाणार आहेत. त्यांच्याकडून या दोन्ही खात्यांचे धोरण निश्चित केले जाईल आणि त्या धोरणानुसार कार्यवाही होते कि नाही, हे त्या पहातील. या कामात त्यांना डॉ. गीता देशमुख साहाय्य करतील, असे आरोग्यमंत्री राणे यांनी घोषित केले आहे.