न्यासासाठी घटना सिद्ध करणे, तिच्यात दुरुस्ती करणे आणि दोन किंवा अधिक न्यासांचे विलिनीकरण करणे (कलम ५० अ) !

श्री. दिलीप देशमुख

१. ‘महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक न्यासांचा कारभार/प्रशासन त्या त्या न्यासाच्या घटनेप्रमाणे / नियमावलीप्रमाणे चालतो. सार्वजनिक न्यासांची नोंदणी करते वेळी नोंदणी अर्जासमवेत त्या न्यासाची प्रस्तावित घटना / नियमावली सादर करणे अपेक्षित आहे.

२. काही न्यासांनी नोंदणीसाठी अर्ज सादर करते वेळी प्रस्तावित घटना / नियमावली प्रविष्ट (दाखल) केलेली नव्हती, अशी काही उदाहरणे पहाण्यास मिळतात. अशा न्यासांना त्यांचा दैनंदिन कारभार / प्रशासन चालवतांना अडचणी येतात. हे लक्षात घेऊन अशा न्यासांसाठी घटना / नियमावली सिद्ध करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्त / सह / उप / साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना ‘कलम ५० अ’प्रमाणे दिलेले आहेत.

३. काही सार्वजनिक न्यासाची घटना / नियमावली असते; परंतु त्यातील काही प्रावधाने / नियम कालबाह्य झालेले असतात. अशा न्यासांसाठी कालसुसंगत घटना करणे किंवा मूळ घटनेत दुरुस्ती करणे, हेही अधिकार ‘कलम ५० अ’प्रमाणे धर्मादाय आयुक्त / सह / उप / साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना मिळालेले आहेत.

४. सारखेच उद्देश असलेले २ वेगवेगळे न्यास असतात. एका न्यासाची आर्थिक परिस्थिती कमकुवत, तर एका न्यासाची आर्थिक परिस्थिती सक्षम असू शकते. एका न्यासाचे विश्वस्त वयोवृद्ध, तर एका न्यासाचे विश्वस्त तरुण असू शकतात. एखाद्या न्यासाच्या विश्वस्ताची उत्तरदायित्वातून मुक्त होण्याची इच्छा असू शकते. अशा प्रकारचे दोन न्यास एकाच भागात / परिसरात असतील आणि एका न्यासाच्या विश्वस्तांची तो न्यास दुसर्‍या न्यासात विलिनीकरण करण्याची इच्छा असेल आणि दुसरा न्यास विलिनीकरण स्वीकारण्यास सिद्ध असेल अन् हे विलिनीकरण दोन्ही न्यासांच्या हिताचे असेल, तर अशा प्रकारचे विलिनीकरण करण्याचा आणि त्यासाठी स्वतंत्र घटना सिद्ध करण्याचे अधिकार ‘कलम ५० अ’प्रमाणे धर्मादाय आयुक्त / सह / उप / साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना आहेत.

५. न्यासासाठी घटना / नियमावली सिद्ध करणे, घटनेत / नियमावलीत दुरुस्ती करणे किंवा दोन न्यासांचे विलिनीकरण करणे यांसाठी न्यासाशी संबंधित दोन किंवा अधिक व्यक्तींनी विहित नमुन्यात अर्ज प्रविष्ट करणे आवश्यक असते. अर्जासमवेत घटनेचा मसुदा / प्रस्तावित दुरुस्तीचे मुद्दे सादर करणे अपेक्षित आहे.

६. न्यासासाठी घटना करणे किंवा घटनेत दुरुस्ती करणे यांसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विश्वस्तांना त्यांची बाजू मांडता यावी, यासाठी त्यांना सूचनापत्र पाठवले जाते.

७. दोन न्यासांचे विलिनीकरण करावे, यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या न्यासाची मिळकत ज्या भागात आहे, त्या भागात सर्वाधिक वितरित होणार्‍या वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले जाते.

८. अर्जदार, संबंधित विश्वस्त, आक्षेप अर्जदार किंवा संबंधित व्यक्ती यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि योग्य ती चौकशी केल्यानंतर धर्मादाय आयुक्त यांना जर असे वाटले की, न्यासासाठी नवीन घटना करणे / घटनेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे किंवा दोन न्यासांचे विलिनीकरण करणे, हे दोन्ही न्यासांच्या हिताचे आहे, तर ते त्याप्रमाणे घटना संमत करण्याचा / घटनेत दुरुस्ती करण्याचा / दोन न्यासांचे विलिनीकरण करण्याचा आदेश पारित करू शकतात किंवा अर्ज अमान्य करू शकतात.’

– श्री. दिलीप मा. देशमुख, निवृत्त सह धर्मादाय आयुक्त, पुणे. (९.३.२०२५)