
बारामती – संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ, तसेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बारामती येथे सर्व धर्मीयांचा विराट जनआक्रोश मोर्चा पार पडला. कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. दुपारी बारामती शहरात पूर्ण बंद पाळण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना ‘मराठा क्रांती मोर्चा’ आणि समस्त सर्वधर्मीय बारामतीकरांच्या वतीने विविध मागणी असलेले निवेदन दिले. आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवावा, पसार आरोपीला अटक करावी, आरोपींना कारागृहात देण्यात येणारी विशेष वागणूक बंद करावी, गुन्हेगारांना ते वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यात न ठेवता दुसर्या जिल्हा कारागृहात ठेवावे अशा मागण्या या वेळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे ! – संपादक)
संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार आणि संपत्तीची चौकशी करावी, मसाजोग गावाला पोलीस संरक्षण द्यावे, अशा अनेक फलकांनी मोर्चामध्ये लक्ष वेधले. धनंजय मुंडे यांच्या विरोधातही घोषणा देऊन नागरिकांनी संताप व्यक्त केला.