पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचे प्रकरण

पणजी, १५ मार्च (वार्ता.) – उत्तर गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तथाकथित सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावरील याचिका प्रलंबित असतांना अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने रामा काणकोणकर यांना कह्यात घेण्यात आल्यास त्यांची ५० सहस्र रुपये वैयक्तिक हमीवर सुटका करावी, असा अंतरिम निवाडा दिला आहे. रामा काणकोणकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १७ मार्च या दिवशी होणार आहे.
तपोभूमी, कुंडईचे पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्या विरोधात अनुद्गार काढल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी रामा काणकोणकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम २९९, १९८, ३५३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी कह्यात घेऊ नये, यासाठी रामा काणकोणकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर १५ मार्च या दिवशी सुनावणी झाली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे निवाडा दिला. पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्याविषयी अनुद्गार काढल्याबद्दल रामा काणकोणकर आणि शंकर पोळ यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंद झालेल्या आहेत.
सूरज आरोंदेकर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
म्हापसा – धार्मिक भावना दुखावणे, धर्माच्या आधारावर गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्याविषयी अपमानास्पद टिपण्णी करणे यांसंदर्भात सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्या अनुयायांनी पर्वरी पोलीस ठाण्यात काणका, म्हापसा येथील सूरज आरोंदेकर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर पोलिसांनी सूरज आरोंदेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सूरज आरोंदेकर यांच्या विरोधातील गेल्या २ दिवसांतील ही दुसरी तक्रार आहे. सुकूर आणि पर्वरी परिसरातील स्थानिकांच्या एका गटाने यापूर्वी सूरज आरोंदेकर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. अश्लील भाषा वापरणे, विशिष्ट जाती आणि काही लोक यांना लक्ष्य करून त्यांची अपकीर्ती करणे यांप्रकरणी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.