BIS Raid On Amazon, Flipkart Warehouses : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आदी संकेतस्थळांवरून विकली जात आहेत बनावट उत्पादने !

नवी देहली – ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या संकेतस्थळांवरून अप्रमाणित उत्पादनांची विक्री हात असल्याने भारतीय मानक विभागाने (बी.आय.एस्.ने – ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस) ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसह अनेक आस्थापनांच्या गोदामांवर धाडी घातल्या. या कारवाईत बी.आय.एस्. प्रमाणपत्र नसलेली सहस्रो ग्राहकोपयोगी उत्पादने जप्त करण्यात आली. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १५ मार्च या दिवशी ही माहिती दिली.

बी.आय.एस्.च्या पथकाने ७ मार्च या दिवशी लक्ष्मणपुरीमधील (उत्तरप्रदेश)  ॲमेझॉनच्या गोदामावर धाड घातली असता येथे बी.आय.एस्. प्रमाणपत्राविना विकली जात असलेली २१५ खेळणी आणि २४ ‘हँड ब्लेंडर’ (घुसळण्याचे यंत्र) जप्त केले. फेब्रुवारीमध्ये हरियाणाच्या गुरुग्राममधील ॲमेझॉन गोदामातून ५८ ॲल्युमिनियम फॉइल, ३४ धातूच्या पाण्याच्या बाटल्या, २५ खेळणी, २० हँड ब्लेंडर, ७ पीव्हीसी केबल्स, २ फूड मिक्सर आणि १ स्पीकर जप्त करण्यात आले होते.

फ्लिपकार्टच्या गोदामातून ५०० हून अधिक बाटल्या जप्त

बी.आय.एस्.ने ‘इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड‘द्वारे चालवल्या जाणार्‍या गुरुग्राममधील फ्लिपकार्टच्या गोदामावरही धाड घातली. येथून ५३४ स्टेनलेस स्टील व्हॅक्यूम इन्सुलेटेड बाटल्या, १३४ खेळणी आणि ४१ स्पीकर जप्त करण्यात आले आहेत.

देहलीत २ गोदामांवर धाडी घालून तेथून अनुमाने ७ सहस्र इलेक्ट्रिक वॉटर हीटर, ४ सहस्र इलेक्ट्रिक फूड मिक्सर, ९५ इलेक्ट्रिक रूम हीटर आणि ४० गॅस स्टोव्ह जप्त करण्यात आले आहेत.

कठोर शिक्षा आणि मोठा दंड यांची कायद्यात तरतूद

बी.आय.एस्. कायद्यांतर्गत अशा गुन्ह्यांसाठी किमान २ लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, जो विकल्या जाणार्‍या अ-मानक उत्पादनांच्या किमतीच्या १० पट पर्यंत वाढू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये २ वर्षांपर्यंत कारागृहवासाची तरतूद देखील आहे.

बीआयएसने ई-कॉमर्स आस्थापनांना नोटीस बजावली

बी.आय.एस्.ने अमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, मिंत्रा बिगबास्केट यांसारख्या मोठ्या ऑनलाईन आस्थापनांना नोटिसा पाठवल्या असून त्यांनी केवळ बी.आय.एस्. प्रमाणित उत्पादने विक्रीसाठी सूचीबद्ध करावीत, अशा सूचना दिली आहे.