उत्सवामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण

देवगड – तालुक्यातील मिठबांव, कातवण, तांबळडेग या तिन्ही गावांचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वराचा देवहोळी उत्सव ३०० वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वर यांची भेट झाली होती. या ऐतिहासिक घटनेनंतर ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देवहोळी उत्सव पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. होळी पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर श्री देव रामेश्वर रवळनाथ मंदिराजवळ माडाची होळी उभारून हा पवित्र सोहळा पार पडला. होळी उभारणीसाठी लागणारा ‘कल्पवृक्ष’ (माड) विजय काळे यांच्या बागेतून तोडून वाजत-गाजत मंदिराकडे आणण्यात आला. त्यानंतर आंब्याच्या टाळांनी सजवून आणि त्याच्या टोकाला निशाण (झेंडा) बांधून होळीच्या मांडावर होळी उभी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये गावातील सर्व मानकरी गावघर रयतेने मोठ्या भक्तीभावाने सहभाग घेतला. होळदेवाचे पवित्र पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावाने होळदेवाचे दर्शन घेतले. रात्री ९ वाजता पारंपरिक प्रथेनुसार अन्य देवतांनी ११ प्रदक्षिणा घालून होळदेवाला वंदन केले. होळी उभारणीपासून पुढील ५ दिवस जागर करून श्री देव रामेश्वराचा होलिकोत्सव मंगलमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. तब्बल ३०० वर्षांनंतर जुळून आलेल्या या उत्सवाने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परंपरेचे भविष्यात जतन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.