शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस (व्यवसाय) करणार्या वैद्यांना रुग्णांकडून येणारी ‘मला पंचकर्म करायचे आहे’, ही मागणी नवीन नाही. ‘नुसतेच पंचकर्म करायचे आहे’, अशी इच्छा असणारे अनेक रुग्ण चिकित्सालयात येत असतात. तसे करायला हरकतही काहीच नाही. ‘पंचकर्म म्हणजेच रिलॅक्सेशन थेरपीच (विश्रांतीचे तंत्र) आहे’, असा गैरसमज असणारे अनेक आहेत; पण खरेतर पंचकर्म याला चिकित्सीय दृष्टीकोनही तितकाच अधिक आहे.
१. ‘स्पा’ आणि पंचकर्म यांत भेद असणे
पंचकर्मामध्ये मुळात दोष शोधन किंवा शरिरात वाढलेले किंवा नको त्या ठिकाणी असणारे दोष बाहेर काढून टाकणे, हा उद्देश असतो. पंचकर्म रोगाप्रमाणे आणि ऋतुप्रमाणे असे करता येते. दोष म्हणजे काय ?, कुठल्या ऋतूमध्ये कुठले पंचकर्म करायचे ? याची माहिती वैद्य देऊ शकतात. जेव्हा तुम्ही वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या चिकित्सा घेता, तेव्हा त्यांना चिकित्सीय दृष्टीकोन असल्याने पथ्य पालन करणे महत्त्वाचे असते, त्या वेळी ते नीट न पाळल्यास त्रास होऊ शकतो. ‘स्पा’ (संपूर्ण अंगाला तेल लावण्याची प्रक्रिया) आणि प्रत्यक्ष वैद्यकीय शिक्षण घेऊन शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिसचा अनुभव असलेल्या वैद्यांकडून पंचकर्म करून घेणे, यांत बरीच तफावत आहे.
मुळात ‘स्पा थेरपी’, म्हणजे पंचकर्म क्रिया नाहीत; पण आयुर्वेद विचाराचा वापर करून ‘स्पा’सारखे उपक्रम करता येऊ शकतात, म्हणजेच आयुर्वेदाचा आवाका पुष्कळ अधिक आहे. असाही एक गैरसमज दिसतो की, मसाज (मर्दन करणे), स्टीम (वाफ घेणे), पोट्टली स्वेदन म्हणजेच पंचकर्म. हे सर्व पंचकर्माच्या आधी किंवा स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून केले जातात, ज्याचा उत्तम लाभ दिसतो; परंतु रुग्णाच्या शरिरातील रोगाचा जोर, पंचकर्माने काय साध्य करायचे आहे ? यानुसार काय करून घ्यावे, हे वैद्य नीट सांगू शकतात. ‘आम्लपित्तासाठी केवळ पंचकर्म करा. औषधे नको किंवा संधीवातासाठी केवळ मसाज आणि एखादा स्वेदन प्रकार करा. आम्ही अमुक आस्थापनाच्या काही गोळ्या घेत आहोत’, हा पूर्ण आयुर्वेद उपचार नाही.

२. औषध आणि पंचकर्म हे दोन्ही एकत्र करणे महत्त्वाचे !
हे सांगायचा उद्देश हा की, बर्याचदा केवळ पंचकर्म करून आल्यावर रुग्ण ‘आयुर्वेद उपचाराचा तेवढ्यापुरता लाभ झाला’ किंवा ‘आम्ही अमुक एका वैद्यांकडे या या रोगासाठी पंचकर्म केले; पण काही फरक पडला नाही’, ही वाक्ये येतात. खरेतर औषध आणि पंचकर्म हे हातात हात घालून जाणार्या गोष्टी आहेत, ज्यामुळे चिकित्सा पूर्ण होते. प्रत्येक रुग्णाला पंचकर्म करावे लागेलच, असेही नाही. याचा जाणकार तुमचा वैद्य असतो.
३. वैद्यकीय मार्गदर्शन घेऊनच पंचकर्म करणे आवश्यक !
पंचकर्म चिकित्सा घेतल्यावर दोष बाहेर पडल्यावर येणारा अशक्तपणा हा योग्य आहे. तो काही काळ येणे आणि मग त्यानंतर शरिरात हलकेपणा, रोगाचा नाश आणि स्वास्थ्यप्राप्ती हे अपेक्षित आहे. हे कंगोरे एखादा शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेली व्यक्ती तुम्हाला सांगू शकेल. लेखाचा उद्देश एवढाच की, रुग्णांनी / लोकांनी शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सीय उद्देशाने पंचकर्म करायचे असल्यास शिक्षित वैद्यांकडून नीट वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन मग करावे.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.