चिपळूण येथे २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन

मंदिर संस्कृतीरक्षण आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी मंदिरांचे संघटन आवश्यक ! – श्री. रमेश कडू, दापोली तालुका संयोजक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर महासंघ

गुहागर – मंदिरांचे संघटन करणे, मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे, मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे, या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे. या दृष्टीने मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दापोली तालुका संयोजक श्री. रमेश कडू यांनी केले.

चिपळूण येथे २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रचार-प्रसार चालू आहे. या अंतर्गत गुहागर येथील ‘कड्या’वरील श्री गणपति मंदिरात झालेल्या पंचक्रोशीतील देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत श्री. कडू बोलत होते. बैठकीत मंदिरांच्या समस्यांविषयी चर्चा झाली. त्यानंतर सर्वांनी,‘महासंघाच्या माध्यमातून संघटितपणे कार्य करू’, असे मत व्यक्त केले.
शासन हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; मात्र अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा विचार होत नाही. याचे कारण हिंदू असंघटित आहेत. हिंदूंचा दबाव गट नाही, असे वक्तव्य महासंघाचे दापोली तालुका मंदिर संयोजक श्री. सुरेश रेवाळे यांनी केले.

या वेळी ‘कड्या’वरील श्री गणपती मंदिराचे अध्यक्ष श्री. सुरेश महादलेकर, कार्याध्यक्ष श्री. विध्वांस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी आणि श्री. चंद्रकांत उजाळ, ग्रामदैवत श्री काळभैरव देवस्थानचे अध्यक्ष श्री. संतोष गुरव यांसह श्रीराम मंदिर, मुर्डी; दत्तमंदिर, आडे; श्रीराम मंदिर, आडे, तसेच इळणे, वाघिवणे, माळवी, बोरथळ इत्यादी गावांतील २५ देवस्थानांचे ५० विश्वस्त उपस्थित होते.