अमेरिकी ‘थिंक टँक’चा दावा !

बीजिंग (चीन) – चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपीच्या) सैन्याला बळकटी देण्याचा उद्देश सत्तेवरची पकड टिकवून ठेवणे आहे, कोणत्याही बाह्य शत्रूशी लढणे नाही. चीनचा सत्ताधारी पक्ष युद्धासाठी सैन्य सिद्ध करण्याऐवजी सत्तेत रहाण्यासाठी सैन्यात सुधारणा करत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संधी मिळेल, तेव्हा चिनी सैन्याला युद्धभूमीवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा दावा अमेरिकी ‘थिंक टँक’ ‘रँड कॉर्प’ ने(‘थिंक टँक’ म्हणजे धोरणे किंवा संशोधन करणारी संस्था) तिच्या अहवालात केला आहे. काही तज्ञ अहवालातील निष्कर्षांशी असहमत आहेत. ते म्हणतात की, शी जिनपिंग यांनी त्यांचे सर्वोच्च सैनिकी ध्येय स्पष्ट केले आहे. तैवान कह्यात घेणे हे ध्येय आहे आणि चिनी लोक तसे करण्यास सिद्ध आहेत.
अहवालाचे लेखक टिमोथी हीथ यांचा युक्तीवाद आहे की,
१. चिनी सैन्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि सीसीपी राजवट राखण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. चीनचे सैनिकी आधुनिकीकरण हे सीसीपी राजवटीचे आकर्षण आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी रचना केलेले आहे.
२. सैन्याच्या प्रशिक्षण वेळेपैकी ४० टक्के वेळ राजकीय विषयांवर घालवते. या वेळेचा वापर युद्धात प्रभुत्व मिळवण्यासाठी करता येईल; पण तसे नाही. यामुळे सैन्य आधुनिक युद्धासाठी किती सिद्ध आहे यावर प्रश्न उपस्थित होतात. सैन्याच्या तुकड्यांच्या नेतृत्वात अशा राजकीय व्यक्तींचा समावेश आहे जे लढाऊ क्षमतेपेक्षा पक्षाशी निष्ठा ठेवण्यावर भर देतात.
३. अमेरिका आणि चीन यांमध्ये पारंपरिक युद्धाची शक्यता खूपच कमी आहे. ‘पेंटागॉन’च्या (अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या) योजनाकारांनी क्षेपणास्त्रे आणि बाँब यांच्या पलीकडे असलेल्या चिनी धोक्यांच्या विस्तृत श्रेणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
४. इतिहासाने वारंवार दाखवले आहे की, सैन्य अनेकदा युद्धात त्यांच्या प्रगत शस्त्रांचा प्रभावीपणे वापर करण्यात अपयशी ठरते. युक्रेनमध्ये चांगल्या सशस्त्र सैन्याला विजय मिळवता आला नाही. चिनी सैन्य युद्धात त्यांच्या आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात यशस्वी होईल कि नाही याबद्दल शंका आहे.
चिनी सैन्यात भ्रष्टाचार !
चिनी सैन्यालाही सैनिकांची कमतरता आणि भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. अलीकडच्या एका अहवालात म्हटले आहे की, चिनी सैन्य आणि सरकारच्या वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे शी जिनपिंग यांच्या संरक्षण उभारणीत अडथळा येत आहे. यामुळे सैन्याच्या कारवाईच्या क्षमतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

संपादकीय भूमिकाअमेरिकी थिंक टँकचा दावा किती खरा आहे, हा अभ्यासाचा विषय असला, तरी चिनी सैन्याला भारताने वर्ष १९६७ मध्ये आणि वर्ष २०२२ च्या गलवान येथील संघर्षात धडा शिकला होता, हे सत्य आहे. त्यामुळे अशा सैन्याला पराभूत करणे अवघड नाही, हे भारतिया सैन्याला ठाऊक आहे ! |