रणवीर अलाहाबादिया याला झाली उपरती !
मुंबई – युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या संदर्भात त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणात तो पसार असून त्याचा भ्रमणभाष बंद आहे, अशी वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्याने एका ‘पोस्ट’द्वारे सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मला सतत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. माझ्या आईच्या चिकित्सालयात काही लोकांनी आक्रमण केले. मी आणि माझा चमू पोलीस अन् अन्वेषण अधिकारी यांना सहकार्य करत आहोत. मी सगळ्या नियमांचे पालन करून सर्वांसाठी उपलब्ध रहात आहे. पालकांविषयी मी केलेले वक्तव्य हे असंवेदनशील आणि वरिष्ठांचा अनादर, अपमान करणारे होते. येथून पुढे चांगले काम करणे हे माझे नैतिक दायित्व आहे. झालेल्या प्रकाराविषयी मी मनापासून क्षमा मागतो. गेल्या काही द़िवसांपासून माझ्या कुटुंबियांना या सगळ्या प्रकरणाचा मानसिक त्रास होत आहे. लोकांना मला मारून माझ्या कुटुंबियांना दु:ख द्यायचे आहे. मी प्रचंड घाबरलो आहे. आता काय करावे, हे मलाही कळत नाही. मी पळून जात नाही. मला पोलीस आणि भारताची न्यायव्यवस्था यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.’’