‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळे’चा अहवाल

शहरातील पाण्याच्या सर्व टाक्या धुवून घेणार
पुणे – शहरासह जिल्ह्यांमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी.एस्.)चे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आले. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे आणि त्यामुळे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेसह आरोग्य विभाागने शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा दावा केला होता; परंतु पडताळणीमध्ये जलशुद्धीकरणामध्ये अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. शहरातील ४ सहस्र ६६१ ठिकाणांचे पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यातील ५५ ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले आहे. (मूलभूत आवश्यकता असलेल्या पाण्याच्या पुरवठ्यामध्ये महापालिकेचा अक्षम्य हलगर्जीपणा ! – संपादक) आरोग्य विभागाने पुणे शहर आणि सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला, धायरी, नांदेड गाव या परिसरांतील आतापर्यंत पाण्याच्या ४ सहस्र ६६१ नमुन्यांची पडताळणी केली. ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळे’च्या (‘एन्.आय.व्ही’च्या) पडताळणीमध्ये काही रुग्णांच्या नमुन्यांमध्ये ‘नोरोव्हायरस’ आणि ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ आढळून आले. याचा संसर्ग हा दूषित पाण्यातून आणि अन्नाच्या माध्यमांतून होतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहरातील पाण्याच्या टाक्या धुवून काढणार !
दूषित पाण्यामुळे रोगाचा संसर्ग होतो, हे निश्चित झाले आहे. रुग्णसंख्या अधिक वाढू नये यासाठी काळजी घेण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील लहान-मोठ्या अशा ३५० पाण्याच्या टाक्या पुढील महिन्याभरात स्वच्छ धुवून काढण्यात येणार आहेत. (शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता का केली जात नाही ? दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या मृत्यूशी कारणीभूत असणार्या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे ! – संपादक) त्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे.