चांदणी चौकात छत्रपती शिवरायांचा ६० फुटी पुतळा उभारण्यास संमती !

चांदणी चौक

पुणे – चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्गालगत महापालिकेच्या वतीने हिंदवी स्वराज्य निर्मिती संदर्भातील शिल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये ६० फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमती दिली आहे. यासाठी ७ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. चांदणी चौक परिसराचे सौंदर्य वाढावे आणि पर्यटनाचे नवे ठिकाण विकसित व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या ५ सहस्र ५४२ चौरस मीटर उपलब्ध जागेत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्याचा निर्णय झाला.

भव्य प्रवेशद्वार, कमळाच्या पाकळ्यांच्या आकारातील कारंजे, ३० फूट उंचीचा चौथरा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला जाणार आहे. उर्वरित जागेत शोभेची फुलझाडे लावून उद्यान साकारले जाणार आहे. यासाठी ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने काही दिवसांपूर्वी संमती दिली आहे. पुतळा उभारण्यासाठी संरक्षण मंत्रालयासह केंद्रशासनाच्या अखत्यारितील अन्य विभागांची अनुमती घ्यावी लागेल. पुतळ्याची उंची अधिक असल्याने सुरक्षेची मानके पूर्ण केली जातील, असे अधिकार्‍यांनी सांगितले.