
कोल्हापूर – भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील ‘सद्गुरु श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने सभामंडप आणि स्वच्छतागृहाच्या कामांसाठी साडेतीन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा धर्मादाय कार्यालयाकडूनच अवैधरित्या प्रसिद्ध झाल्याची नोंद घेत जिल्हाधिकार्यांनी धर्मादाय उपायुक्त आणि भुदरगड तहसीलदारांना याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सद्गुरु श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी सभामंडप आणि स्वच्छतागृह बनवण्यात येणार आहे. त्यासाठी आधी निविदेद्वारे वास्तूविशारद व्यक्तीची नियुक्ती करून तिच्याकडून आराखडा घेऊन त्यानंतर देवस्थानच्या अभियंत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक करून त्याला प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असते. हे सगळे टाळून सांगलीतील एका आस्थापनाकडे हे काम सोपवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून निविदा भरायची आणि ती आदमापूर येथे उघडण्यात येणार होती. या प्रकाराच्या संदर्भात संशय निर्माण झाल्यावार एका भक्ताने धर्मादाय उपायुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.